करोनावरील उपचारांसाठी औषध म्हणून योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने नुकत्याच तयार केलेल्या ‘कोरोनिल’च्या विक्रीवर आयुष मंत्रालयाने कुठलेही निर्बंध घातले नसल्याचे कंपनीने बुधवारी सांगितले. मात्र या रोगाच्या ‘नियंत्रणासाठी’ हे औषध असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

दरम्यान, पतंजली ‘कोरोनिल’ हे औषध विकू शकते; मात्र ते कोविड-१९ वरील उपचार म्हणून नाही, असे आयुष मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाने या विशिष्ट सूत्रीकरणाला प्रतिकारशक्तिवर्धक म्हणून परवानगी दिली आहे, करोनाचे औषध म्हणून नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पतंजलीने करोनाच्या नियंत्रणासाठी योग्य ते काम केल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे पत्रकार परिषदेत केला. ‘या औषधाच्या विक्रीवर आता काही निर्बंध नसून, ते आजपासून देशभरात सर्वत्र उपलब्ध राहील हे मी औषध वापरण्याची इच्छा असलेल्या लोकांना सांगू इच्छितो’, असे त्यांनी कोरोनिलसह इतर दोन औषधांचा उल्लेख करून सांगितले.

आयुष मंत्रालयाने आपल्याला ‘कोविड उपचार’ऐवजी ‘कोविड व्यवस्थापन’ असे शब्द वापरण्यास सांगितले असून आपण या सूचनेचे पालन करत आहोत, असेही रामदेव म्हणाले. करोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर या औषधाची चाचणी यशस्वी ठरली असल्याचा दावा कंपनीने कायम ठेवला आहे.