चीन सरकारला सर्वात आधी कोरोना व्हायरसबद्दल चेतावणी देणाऱ्या डॉक्टरचं निधन झालं आहे. दुर्दैवी बाब म्हणजे ज्या व्हायरबद्दल त्यांनी सरकारला चेतावणी देण्याचा प्रयत्न केला त्याचीच लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग यांनी चेतावणी दिल्यानंतरही सरकारने त्यांचा दावा फेटाळून लावला होता. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी ली वेनलियांग यांचं निधन झालं. याआधी त्यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. सर्वात आधी चीनच्या सरकारी मीडिया आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या मृत्यूची बातमी दिली होती. मात्र नंतर वुहान सेंट्रल हॉस्पिटलने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची प्रकृती गंभीर असून वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला होता.

नेत्रचिकित्सक ३४ वर्षीय ली वेनलियांग वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये काम करत होते. ३० डिसेंबरच्या आसपास त्यांनी आपल्या मित्रांना मेसेज करुन हा व्हायरस वेगाने पसरत असल्याचं सांगितलं होतं. या जीवघेण्या व्हायरसबद्दल सर्वात आधी त्यांनीच चेतावणी दिली होती. रुग्णालयात दाखल काही रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसत असल्याचं त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना सांगितलं होतं.

ली वेनलियांग यांनी आपली आणि कुटुंबाची कशी काळजी घ्यावी यासंबंधी एक मेसेज आपल्या शाळकरी मित्रांना पाठवला होता. मात्र काही तासात तो मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे त्यांचं नाव सगळीकडे चर्चेत येऊ लागलं होतं. सोशल मीडियावर अनके जण त्यांचा हिरो म्हणून उल्लेख करु लागले होते. यानंर ली वेनलियांग यांनी प्रतिक्रिया देत, “जेव्हा मी माझा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिलं तेव्हा ते आपल्या नियंत्रणात नसल्याचं लक्षात आलं. यासाठी कदाचित मला शिक्षा होईल,” असं म्हटलं होतं.

मेसेज व्हायरल होऊ लागल्यानंतर स्थानिक पोलिसांनी ली वेनलियांग यांना कोणतीही अफवा पसरवू नका अस सांगितलं होतं. पण ली वेनलियांग यांचा दावा खरा होता हे अखेर सिद्ध झालं. पण दुर्दैवाने त्याच व्हायरसची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. १ फेब्रुवारी रोजी ली वेनलियांग यांना लागण झाल्याचं निष्पन्न झालं. आणि अखेर पाच दिवसांनी त्यांचं निधन झालं.