स्वावलंबी भारत हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. “संपूर्ण जग २१ वं शतक भारताचं असेल असं सांगत होतं. आपण गेल्या शतकापासून २१ वं शतक भारताचं असल्याचं ऐकत आहोत. करोना संकटानंतरही जगात जी स्थिती निर्माण होत आहे ती आपण पाहत आहोत. २१ वं शतक भारताचं व्हावं हे आपलं स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता त्यासाठी स्वावलंबी भारत हाच एकमेव मार्ग आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. भारत जेव्हा स्वावलंबी होण्याबद्दल बोलतो तेव्हा आत्मकेंद्रीत व्यवस्थेबद्दल सांगत नाही. संसाराचं सुख, मदत आणि शांतीची चिंता दर्शवतो. भारताच्या विकासात नेहमी विश्वाची चिंता दिसली आहे. भारताच्या कामाचा प्रभाव विश्वावर पडतो असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

“जगात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून पावणे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका व्हायरसने संपूर्ण जगाचं नुकसान केलं आहे. असं संकट ना कधी पाहिलं ना ऐकलं आहे. हे संकट खूप मोठं आहे. पण थकणं, पराभूत होणं माणसाला मंजूर नाही. सतर्क राहूनही सर्व नियमांचं पालन करायचं आहे. जीव वाचवायचा आहे आणि पुढे वाटचालही करायची आहे. जग संकटात असताना आपल्याला कठोर संकल्प करण्याची गरज आहे. आपला संकल्प या संकटापेक्षाही विराट असणार आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

“एक राष्ट्र म्हणून आज आपण महत्त्वाच्या वळणावर आहोत. करोना संकट भारतासाठी एक संकेत, संदेश, संधी घेऊन आली आहे. जेव्हा करोना संकट सुरु झालं तेव्हा भारतात एकही पीपीई किट तयार नव्हतं. एन-९५ मास्कचं नावापुरतं उत्पादन होत होतं. पण आता भारतात रोज दोन लाख पीपीई किट्स आणि दोन लाख मास्क तयार केले जात आहेत. हे करु शकलो कारण आपण संकटाला संधीत रुपांतरित केलं. आज जगभरात स्वावलंबी शब्दाचा अर्थ आपण पूर्णपणे बदलला आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.