करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, संध्याकाळी पाच वाजता नागरीकांनी टाळया आणि थाळया वाजवून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असे आवाहन केले होते.

या आवाहनाला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद पाहून अमेरिकाही भारावून गेली आहे. अमेरिकेने भारताच्या या जनता कर्फ्यूचे कौतुक केले आहे. खरोखरच हे प्रेरणादायी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून जी सेवा बजावली जातेय, त्याचेही कौतुक केले आहे.

“COVID-19 शी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून लांब असूनही त्यांचे कौतुक करण्यासाठी भारतात नागरीक ज्या प्रमाणे एकत्र आले, ते खरोखरच कौतुकास्पद होते” असे दक्षिण मध्य आशियाचे सहाय्यक सचिव अ‍ॅलिस जी वेल्स यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. पीआयबी टि्वट केलेला एक व्हिडीओ वेल्स यांनी रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय टाळया वाजवताना दिसत आहेत.