देशात भ्रष्टाचार होतोय… मात्र, स्थिती एकदम बिघडलेली नक्कीच नाही, हे मत मांडले आहे देशाचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी. ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले. देशात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ९२ टक्के लोकांनी देशातील भ्रष्टाचाराची स्थिती एकदम बिघडली असल्याचे म्हटले आहे. त्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चिदंबरम यांनी हे मत मांडले.
चिदंबरम म्हणाले, भ्रष्टाचाराचा मुद्दा विनाकारण मोठा करण्यात आला आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयांवर भ्रष्टाचार झाल्याच्या दृष्टिकोनातून कायमच चर्चा होते. काही घटनात्मक संस्थामुळे या स्वरुपाच्या चर्चेला विशेष महत्त्व मिळू लागले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खूप वाढला असल्याचा लोकांचा ग्रह झाला. केंद्र सरकारला आपल्या पुढील प्रश्न काय आहेत, हे माहिती असून, त्यावर उपाय शोधले जात आहेत.
भ्रष्टाचार केवळ भारतात नसून, तो इतर देशांमध्येही होत असल्याकडेही चिदंबरम यांनी यावेळी लक्ष वेधले.