चीनमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोप असणाऱ्या एका माजी बँक अधिकाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. या अधिकाऱ्याने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण १.८ बिलियन युआन (म्हणजेच २७७ मिलियन अमेरिकन डॉलर किंवा २०१९ कोटी ५३ लाख भारतीय रुपयांहून अधिक) लाच म्हणून स्वीकारल्याचा आरोप सिद्ध झालं होता. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी या अधिकाऱ्याला शुक्रवारी मृत्यूदंड देण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.

नक्की वाचा >> भारतासाठी धोक्याचा इशारा, चीन पोहचला अरुणाचलच्या सीमेजवळ; तिबेटला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण

ली शिऑमीन असं मृत्यूदंड देण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. निवृत्तीआधी चीनमधील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन संस्था असणाऱ्या हुआरोंगमध्ये ली शिऑमीन हे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ली शिऑमीन यांना उत्तरेतील तिआनजीन शहरामध्ये मृत्यूदंड देण्यात आल्याचं वृत्त सीसीटीव्हीने (चायना सेंट्रल टेलिव्हजन) दिलं आहे. “ली शिऑमीन यांनी लाच म्हणून घेतलेली रक्कम खूपच मोठी आहे. तसेच ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी लाच स्वीकारली तो गंभीर गुन्हा आहे. याचा समाजावर मोठा परिणाम होऊ शकतो,” असं चीनमधील सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना म्हटलं होतं. ली शिऑमीन यांनी सुनावण्यात आलेल्या शिक्षेसंदर्भात दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही न्यायालायने फेटाळून लावली होती. ली शिऑमीन यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचंही न्यायालायने म्हटलं होतं.

नक्की पाहा >> सरकारी धोरणांवर टीका, ८० हजार कोटींचा तोटा अन् जॅक मा

ली शिऑमीन यांना नक्की कोणत्या पद्धतीने मृत्यूदंड देण्यात आला याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र शिक्षा देण्याआधी ली शिऑमीन यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती असं सांगण्यात आलं आहे.

चीनमधील न्यायालयांमध्ये आरोपींना शिक्षा देण्याचं प्रमाण हे ९९ टक्के इतकं आहे. मात्र असं असलं तरी येथे मृत्यूदंडाची शिक्षा खूप गंभीर गुन्ह्यासाठी सुनावण्यात येते. दर वर्षी चीनमध्ये किती जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते यासंदर्भातील आकडेवारी चीन कधीच जाहीर करत नाही. ही माहिती देशाच्या गुप्त माहितीपैकी असल्याचं सांगण्यात येतं.

नक्की पाहा >> Photos: ‘ही’ आहे ताशी ६२० किमी वेगाने धावणारी चीनमधील ‘फ्लोटिंग ट्रेन’; फोटो पाहून व्हाल थक्क

मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने चीनमध्ये मोठ्याप्रमाणात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यातयेत असल्याचं म्हटलं आहे. जगातील सर्वाधिक मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणाऱ्या देशांच्या यादीत चीन पहिल्या काही देशांमध्ये आहे. दरवर्षी चीनमध्ये हजारो व्यक्तींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते असं अ‍ॅमनेस्टीचं म्हणणं आहे.

नक्की वाचा >> आता धोका Disease X चा; इबोला शोधणाऱ्या डॉक्टरने दिला करोनापेक्षाही भयंकर विषाणूच्या संसर्गाचा इशारा