ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येचा कट पाकिस्तानात रचण्यात आल्याचा खुलासा जम्मू काश्मीर पोलिसांनी केला आहे. पाकिस्तानात हत्येचा कट रचण्यात आला. तीन दहशतवाद्यांवर हत्येची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तपासात लष्कर-ए-तैयबा’ने हत्या केल्याचं उघड झाल्याची माहिती काश्मीर झोनचे पोलीस महासंचालक स्वयम प्रकाश यांनी दिली आहे.

लष्कर ए तोयबाचा दहशतवादी नावेद जट्टने दोन स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने १४ जून रोजी बुखारींची हत्या केल्याचे सांगण्यात येते. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलिसांच्या मते, स्थानिक दहशतवादी दक्षिण काश्मीरचे राहणारे आहेत. सध्या पोलीस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन मोबाइल जप्त केले आहेत. याप्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा स्वयम प्रकाश यांनी केला आहे.

‘रायझिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येचे आदेश ‘लष्कर- ए- तोयबा’चा प्रमुख हाफिज सईदने दिले होते. तर बुखारी यांच्या हत्येचा कट सज्जाद गुलने रचला. सज्जाद हा मूळचा जम्मू- काश्मीरचा असून त्याने बेंगळुरुतील खासगी महाविद्यालयातून एमबीए केले. सध्या तो रावळपिंडीत वास्तव्यास आहे. सईदच्या आदेशानंतर सज्जादने बुखारी यांच्या हत्येसाठी स्थानिक दहशतवाद्यांची निवड केली. बुखारी यांनी रमझानच्या काळात केंद्र सरकारने लागू केलेल्या शस्त्रसंधीचे समर्थन केले होते. यामुळे सईद बुखारींवर चिडला होता. बुखारी यांनी भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेचे नेहमीच समर्थन केल्याने ते दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर होते.

सज्जाद गुलने पाकिस्तानात पळ काढण्यापूर्वी त्याला भारतातील सुरक्षा यंत्रणांनी अटक देखील केली होती. तो काही दिवस श्रीनगरमधील मध्यवर्ती तुरुंगात आणि दिल्लीत तिहार तुरुंगात होता. बुखारींबद्दल सज्जादला माहिती होती आणि याचा फायदा लष्कर- ए- तोयबाने घेतला.  बुखारींविरोधात सज्जादने ब्लॉगही लिहीला होता. यात त्याने बुखारी यांना ‘दगाबाज’ म्हटले होते.