अपुरा पाऊस आणि पांढऱ्या माशीचा प्रार्दुभाव यामुळे यंदा कापसाचे उत्पादन १० ते १५ लाख गाठींनी घटण्याची शक्यता आहे, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षांत ३९० लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये अपुऱ्या पावसामुळे आणि हरयाणा, पंजाब, राजस्थानमध्ये पांढऱ्या माशीने हल्ला चढवल्याने २०१५-१६ मध्ये अपेक्षेपेक्षा १० ते १५ लाख गाठींना उत्पादन कमी होईल, असे सीमा कापूस संशोधन आणि विकास असोसिएशन (सीडीआए)च्या पाहणी अहवालात अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्यावर्षी कापड उद्योगांनी ३०० लाख गाठींचा वापर केला होता. कापड कारखान्यांची मागणी ५५ लाख गाठींची होती. ती पूर्ण होऊ शकल्याने कापसाच्या आयातीला मोठा फटका बसला होता. वास्तविक पाहता ३०० लाख गाठींचे हे प्रमाण (२०१३-१४) आदल्यावर्षीच्या ६.१५ टक्के अधिक होते.
गेल्या वर्षी कापसाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता. बाजारपेठेच्या अंदाजानुसार २०१४-१५ च्या मोसमात ५५ लाख गाठींचे निर्यात झाली होती. कापूस सल्लागार मंडळाला ७० लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज होता. २०१३-१४ मध्ये ११८ लाख गाठींची निर्यात झाली होती, असेही अहवालात म्हटले आहे.
चीनला मागे टाकत कापूस उत्पादनात भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे येत असला तरी देशात अजूनही कापसाचा तुटवडा आहे. यामुळे कापसाची आयात वाढण्याची शक्यता आहे. मध्यम आणि लांब धाग्याच्या कापूसाला २०१५-१६ च्या मोसमात किमान आधारभूत किंमत प्रतिक्विटल ५० रुपयांनी वाढण्यात आली आहे.
यामुळे मध्यम आणि लांब धाग्याची किंमत ३,८०० रुपये आणि ४,१०० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. २०१५-१६ मध्ये कापसाचे उत्पादन किमान ३९० लाख गाठी होईल, असे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात उत्पादनात १० ते १५ लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे, असेही म्हटले आहे.