गेल्या काही दिवसांमध्ये भाजपातील वाचाळवीरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ल्याचे दिसत आहे. नरेंद्र सिंह तोमर, नेपालसिंह, बनवारीलाल सिंघल या नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधाने ताजी असतानाच आता भाजपाचे मुजफ्फरनगरमधील आमदार विक्रम सैनी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. विक्रम सैनी हे मुजफ्फरनगरच्या खतौली मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सोमवारी नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भारत हा हिंदूंचाच देश आहे. मात्र, काही नालायक नेत्यांनी दाढीवाल्यांना येथे थांबवून ठेवले आहे. या लोकांनी आपली जमीन आणि संपत्ती बळकावली आहे. आज हे लोक आपल्या देशात नसते तर सर्वकाही हिंदूंना मिळाले असते, असे विक्रम सैनी यांनी म्हटले.

यावेळी सैनी यांनी समाजवादी पक्षालाही लक्ष्य केले. समाजवादी पक्ष सत्तेत असताना विशिष्ट समुदायाच्याच लोकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळायचा. मात्र, भाजपाचे सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारसरणीनुसार काम करते. यापूर्वीचे सरकार पक्षपातीपणे आणि विशिष्ट समुदायाला फायदा मिळवून देण्याच्यादृष्टीने काम करत होते. दाढी जितकी लांब असेल तितकी मदत सरकारकडून मिळायची, अशी टीका सैनी यांनी केली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वाद तापण्याची शक्यता आहे.

याबद्दल ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने त्यांना विचारणा केली असता सैनी यांनी म्हटले की, माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. माझ्या बोलण्याला फाळणीच्या काळाचा संदर्भ होता. मी फक्त लांब दाढीवाल्यांना सपा सरकारच्या काळात जास्त लाभ मिळायचे, असे म्हटले होते. मात्र, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळेच हा संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्टीकरण सैनी यांनी दिले.