गुरगाव : देशाची सर्व भूमी सुरक्षा दलांच्या ताब्यात सुरक्षित आहे, असा निर्वाळा इंडो-तिबेट सीमा पोलिस दल व सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक एस. एस देसवाल यांनी दिला आहे.

भारत व चीन या देशांत पूर्व लडाखमधून माघारीबाबत मतैक्य झाले असून गेले सात आठवडे सुरू असलेला पेच मिटला असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व लडाखमधील पेच प्रसंगाबाबत विचारले असता देसवाल यांनी सांगितले, की देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. मग ती पूर्व, पश्चिम किंवा उत्तर कुठलीही सीमा असो कुठेही धोका नाही. कारण आपली सुरक्षा दले सक्रिय, सक्षम व समर्पितपणे काम करीत आहेत. आमचे सुरक्षा जवान देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास समर्थ आहेत.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर इंडो तिबेट सीमा पोलिसांचे आणखी जवान तैनात करण्यात आले आहेत काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की गरजेनुसार जवान  तैनात करण्यात येत आहेत. लष्कर व सीमा सुरक्षा दलांचे मनोबल उंचावलेले आहे. आमची सुरक्षा दले सतर्क आहेत.