काँग्रेसशी ‘मैत्री’ करण्याचा भाजपला सल्ला
उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी सरकारच्या सुधारणांच्या दाव्यांवर टीका करताना सरकार याबाबत विवादित संकेत पाठवत असून संसदेतील कोंडी संपविण्यासाठी काँग्रेसला मैत्रीचा हात द्यायला भाजपने पुढाकार घ्यावा, असा सल्ला दिला आहे.
सध्याचे सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव हा आणीबाणीपेक्षाही जास्त आहे. भाजपने पुढाकार घेतल्यास ही परिस्थिती सुधारेल. विविध क्षेत्रांमध्ये सुधारणांची घोषणा करणारे मोदी सरकार नेमके उलट वागत असून विवादित संकेतांमुळे या क्षेत्रांना संभ्रमात टाकत असल्याचे बजाज म्हणाले. भारतीय अर्थशास्त्रज्ञांच्या शिखर परिषदेमध्ये राहुल बजाज बोलत होते. संसदेचे कामकाज चालत नसल्याचे कारण देत १५ महिन्यांत तुम्हाला सुधारणांची कोणतीही जादू दिसणार नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली सांगत आहेत. मात्र, १९९१ मध्ये केवळ एक वर्षांत पंतप्रधान नरसिंह राव यांनी ते शक्य करून दाखविले होते, याचा उल्लेख बजाज यांनी केला.
जीएसटीसारख्या मोठय़ा सुधारणा हव्या असतील तर दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेची परवानगी लागणार आहे आणि काँग्रेसशिवाय ते शक्य नाही. भाजपची आजची आडमुठेपणाची भूमिका पाहता त्यांना आपल्या जबाबदारीचे भान नसल्याचे दिसत आहे. ही आणिबाणी पेक्षाही भयंकर स्थिती असल्याचे बजाज म्हणाले.

नवीन सरकारचा मधुचंद्र १०० दिवसांचा किंवा सहा महिन्यांचा नाही तर एक वर्षांचा आहे. मात्र आजही हे सरकार सुधारणांची अंमलबजावणी करत नाही.
-राहुल बजाज