महाराष्ट्रातच नव्हे तर, राज्या-राज्यांमध्ये करोनाची स्थिती वेगाने बिघडू लागली असून संपूर्ण देश पुन्हा आपत्तीला सामोरे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यांनी प्रतिबंधात्मक उपायांची कडक अंमलबजावणी करावी, असा सल्ला निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला असून करोना आटोक्यात आणण्यासाठी संभाव्य निर्बंधांसाठीही तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद, नागपूर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवाय, दिल्ली आणि बेंगळूरु शहरामध्येही करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील संसर्गदर २३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्या खालोखाल पंजाब (८.८२ टक्के), छत्तीसगढ (८ टक्के), मध्य प्रदेश (७.८२ टक्के), तमिळनाडू (२.५० टक्के), कर्नाटक (२.४५ टक्के), गुजरात (२.२ टक्के), दिल्ली (२.०४ टक्के) या राज्यांमध्येही संसर्गदर एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशभरात सरासरी संसर्गदर ५.६५ टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी दिली.

महाराष्ट्रात संसर्गदर २३ टक्के असेल तर, करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या मध्यात दैनंदिन रुग्णवाढ सरासरी ३ हजार होती, ती आता ३२ हजार इतकी आहे. त्यामुळे राज्यात आरटी-पीसीआर नमुना चाचण्यांचे प्रमाणही तितकेच वाढवले पाहिजे. नमुना चाचण्यांची संख्या वाढवली तरच अधिकाधिक करोनाबाधित रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली येऊ शकतील, असे भूषण म्हणाले.

बेफिकिरीचा परिणाम?

राज्यांमध्ये विलगीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. करोनाबाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात नाही. घरगुती विलगीकरणावर देखरेखही ठेवली जात नसल्याचेही आढळले आहे. घरगुती विलगीकरण योग्य पद्धतीने होत नसेल तर संस्थात्मक विलगीकरण हाच पर्याय असून राज्यांनी तातडीने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे गंभीर निरीक्षण भूषण यांनी पत्रकार परिषदेत नोंदवले. कोणत्याही परिस्थितीत करोनाची परिस्थिती आटोक्यात आणली पाहिजे, गरज असेल तर राज्य प्रशासनाने कायद्यांचा कडक वापर करण्याचाही सल्ला भूषण यांनी दिला.

गुरुवारपासून तिसरा टप्पा

करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा गुरुवारी, १ एप्रिलपासून सुरू होत असून ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील सर्व व्यक्तींना लशीची मात्रा घेता येईल. पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणे या टप्प्यात देखील को-विन संकेतस्थळावर नोंदणी करून लसीकरण केले जाईल. दुपारी ३ नंतर नोंदणी न करताही लसमात्रा घेता येऊ  शकेल. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ५.८ लाख लसमात्रा दिल्या गेल्या असून आत्तापर्यंत ६.११ कोटींहून अधिक लशींची मात्रा दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

पाच सूत्री कार्यक्रम

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी राज्यांशी चर्चा करून पाच सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. मंगळवारीदेखील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव व व्ही. के. पॉल यांनी राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नमुना चाचण्यांची संख्या तातडीने वाढवणे, रुग्णांचे विलगीकरण करणे, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध घेणे, करोना उपचारांना वाहिलेली रुग्णालये वा विभाग पुन्हा सुरू करणे आणि लसीकरणाला वेग देणे असे पाच उपाय एकत्रितपणे राबवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत.

उत्परिवर्तित विषाणूंवर लस प्रभावी

कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन्ही लशी ब्रिटिश आणि ब्राझील उत्परिवर्तित विषाणूंविरोधात प्रभावी असून दक्षिण आफ्रिकेतील उत्परिवर्तित विषाणूसंदर्भात अभ्यास केला जात असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. ८०७ रुग्णांमध्ये ब्रिटिश, ४७ रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिका व एका रुग्णामध्ये ब्राझील उत्परिवर्तित विषाणू आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

सहा राज्यांत   ७८ टक्के रुग्ण

नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांत एकूण ७८ टक्के दैनंदिन रुग्ण असून त्यात महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक व मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. एकूण ७८.५६ टक्के म्हणजे ५६,२११ इतके दिवसभरातील रुग्ण या राज्यातील असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताच्या कोविड १९ आकडेवारीनुसार आता एकूण रुग्णांची संख्या १ कोटी २० लाख ९५ हजार ८५५ झाली असून आणखी २७१ बळी गेले आहेत. मृतांची संख्या १ लाख ६२ हजार ११४ इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू व गुजरात या राज्यात सर्वांत जास्त  ७८.५६ टक्के दैनंदिन रुग्ण  आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक ३१,६४३ रुग्ण असून पंजाबमध्ये २८६८ तर कर्नाटकात दैनंदिन २७९२ रुग्ण आहेत. महाराष्ट्र, गुजरात,पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक, हरयाणा, राजस्थान या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५ लाख ४० हजार ७२० असून ती २४ तासांत १८ हजार ९१२ ने वाढली आहे.

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यात आवर्ती वाढ ७९.९४ टक्के आहे. महाराष्ट्रात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण ६२ टक्के आहे. आतापर्यंत ६.११ कोटी लोकांचे लसीकरण झाले असून प्रत्यक्ष संख्या ६ कोटी ११ लाख १३ हजार ३५४ अशी आहे. ७१ लाख ७४ हजार ९१६ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा देण्यात आली असून ५१ लाख ८८ हजार ७४७  जणांना दुसरी मात्रा देण्यात येईल. आघाडीच्या ८९ लाख ४४ हजार ७४२ जणांना लशीचा पहिली मात्रा दिली असून आघाडीच्या ३७ लाख ११ हजार २२१ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.