आता वैद्यकीय प्राणवायूचा पुरेसा साठा असून देशाच्या विविध भागांतून वाहतूक करून तो रुग्णालयांपर्यंत पोहोचवणे ही मोठी समस्या आहे. मात्र, लोकांनी भयभीत होऊ नये, रुग्णालयांना कमीत कमी वेळेत प्राणवायूचा पुरवठा करण्याचे प्रयत्न शर्थीने केले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.

प्रामुख्याने ईशान्येकडील राज्यांमध्ये तसेच, मध्य भारतात प्राणवायू निर्मिती कारखाने असल्याने तिथून प्राणवायूचे टँकर इष्टस्थळी पोहोचवावे लागत आहेत. या टँकरना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून त्याद्वारे टँकरची सद्य:स्थिती समजू शकते व एखादा टँकर रुग्णालयापर्यंत कधी पोहोचेल, त्यासाठी वाहतूक व्यवस्था कशी करावी लागेल याचा निर्णय घेतला जात आहे. शिवाय, केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत विविध मंत्रालयांच्या सचिवांचा समावेश असलेला गट प्राणवायूची निर्मिती, पुरवठा, वाहतूक आणि उपलब्धता या बाबींवर देखरेख ठेवत असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिव पीयूष गोयल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्राचे उपाय

*  हवाई दलाच्या विमानांनी रिकामे टँकर ईशान्य भारतात नेले जात आहेत. त्यामुळे ५-६ दिवसांचा प्रवास २ तासांत केला जाऊ शकतो. प्राणवायू भरलेले टँकर मात्र विमानातून आणता येत नसल्याने रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही.

*  देशाच्या विविध भागांत प्राणवायू टँकर पोहोचवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘हरित प्रवासपट्टा’ निर्माण केला असून महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांना प्राणावायूचा साठा पुरवला जात आहे.

* राज्यांना नायट्रोजनची वाहतूक करणारे टँकर आवश्यक बदल करून प्राणवायू वाहतुकीसाठी वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.

*  औद्योगिक कारणांसाठी तसेच औषध कुपी, औषधनिर्मिती, लष्करासाठीदेखील प्राणवायूच्या वापरावर सोमवारी बंदी घालण्यात आली. औद्योगिक क्षेत्राला प्राणवायू र्निमिती व साठा वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करण्याचे आवाहन करण्यात आले.

* २५ एप्रिल रोजी सार्वजनिक तसेच खासगी पोलाद कारखान्यांतून ३१३१.८४ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला. या कारखान्यांतून गेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन १५००-१७०० मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध झाला होता.

*  चेन्नई येथील वेदांत पोलाद कारखान्यातून प्राणवायू निर्मितीला मुभा देण्यात आली आहे. जिंदल पोलाद कारखान्यातून ७० टन प्राणवायू दिल्लीला मिळेल.

* ५५१ प्राणवायू निर्मिती कारखाने स्थापन करण्यास तत्त्वत: मुभा देण्यात आली असून ईशान्येकडील राज्यांमध्ये १३ कारखान्यांसाठी सोमवारी केंद्राने अधिकृत परवानगी दिली.

* अमेरिकेतून ३१८ प्राणवायू विलगीकरण यंत्रे आयात करण्यात आली आहेत. गरजेनुसार परदेशातून वैद्यकीय  प्राणवायू आयात केला जात आहे.