भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी नुकतेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर ओआरओपी वरुन टीका केली होती. यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, देश सध्या ओडोमॉसने (ओवरडोस ऑफ ओन्ली मोदी, ओन्ली शाह) त्रस्त आहे. ट्विटकरुन ओमर यांनी शहांच्या या वक्तव्याला उत्तर दिले आहे.


दोन दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये एका निवडणूक सभेमध्ये संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते, मोदी सरकारनं वन रँक वन पेन्शनच्या (ओआरओपी) माध्यमांतून माजीसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित केलं. मात्र, काँग्रेसने ‘ओन्ली राहुल, ओन्ली प्रियंका’द्वारे या दोघांचचं भविष्य सुरक्षित केलं. शहांच्या या वक्तव्याचाच ओमर यांनी समाचार घेतला आहे.

प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर टीका करणारे शाहा हे भाजपाचे पहिलेच नेते नाहीत, त्यांच्या आधी बिहारचे मंत्री प्रमोद कुमार यांनी म्हटले होते की, प्रियंका अजून लहान मुलगी आहे. जर काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लढाई करायची आहे तर त्यांनी सोनिया गांधींना मैदानात उतरवले पाहिजे.

तत्पूर्वी बिहारचे आणखी एक मंत्री विनोद नारायण झा म्हणाले होते की, प्रियंका खूपच सुंदर आहे मात्र, सुंदरतेवर मतं मिळत नाहीत. त्या रॉबर्ट वद्रा यांच्या पत्नी आहेत जे जमीन घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी आहेत.