इतर देशांपेक्षा भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे ३.२ टक्के इतके आहे. काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. या तुलनेत जागतिक करोना मृत्युदर ७.५ टक्के राहिलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिली.

जगभरात ४१ लाख लोक करोनाग्रस्त झाले असून त्यापैकी आत्तापर्यंत २ लाख ८५ हजार रुग्ण दगावले. भारतात २२९३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मंगळवारी हर्षवर्धन यांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात केवळ मृत्यूचा दर कमी आहे असे नव्हे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. हे प्रमाण आता ३१.७० टक्क्यांवर पोहोचलेले आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२,४५५ इतकी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १५३८ रुग्ण बरे झाले. मात्र देशभरातील करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७० हजाराच्या घरात गेली असून मंगळवारी ती ७०,७५६ इतकी झाली. सोमवारी एका दिवसात चार हजारहून अधिक रुग्णांची भर पडली होती. गेल्या चोवीस तासांमध्ये ३६०४ नवे रुग्ण आढळले व ८७ रुग्णांचा मृत्यू झाला.

हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १४ दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण १०.९ दिवस होते. गेल्या तीन दिवसांमध्ये ते १२.२ दिवसांवर आले आहे. केवळ २.३७ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. ०.४१ टक्के रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर आहेत, तर १.८२ रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे.

देशभरातील नमुना चाचण्यांची क्षमता प्रतिदिन एक लाखांवर पोहोचली असून  गेल्या आठवडय़ात ती ९५ हजार होती. ३४७ सरकारी तसेच, १३७ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांत आत्तापर्यंत १७ लाख ६२ हजार ८४० नमुना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ८६,१९१ नमुना चाचण्या झाल्या, असे हर्षवर्धन म्हणाले.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी गरजेचे असलेले ७६ लाख एन-९५ मास्क पुरवण्यात आले आहेत. ४० लाख पीपीई केंद्राने राज्यांना दिले आहेत. सध्या देशभर ८८० करोना उपचार रुग्णालये कार्यरत असून त्यामध्ये एक लाख ७७ हजार ४५८ खाटा उपलब्ध आहेत. त्याशिवाय २०५८ आरोग्यसेवा केंद्रांमध्ये एक लाख ३२ हजार ७४६ खाटा असून ५४२४ करोनासेवा केंद्रामध्ये चार लाख संशयितांना देखरेखीखाली ठेवण्याची क्षमता असल्याची माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.

६ लाख ४८ हजार मजूर रवाना

गेल्या १२ दिवसांमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी ५४२ श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या व त्यातून सहा लाख ४८ हजार मजूर मूळ राज्यांकडे रवाना झाले. ४४८ रेल्वे गंतव्य स्थानी पोहोचल्या असून ९७ रेल्वे मार्गावर आहेत. सर्वाधिक रेल्वे उत्तर प्रदेश (२२१) व बिहारकडे (११७) सोडण्यात आल्या. आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांकडे प्रत्येकी १, तर तेलंगणा आणि पश्चिम बंगाल (२), महाराष्ट्र (३), राजस्थान (४), झारखंड (२७), ओडिशा (२९), मध्य प्रदेश (३८) या राज्यांतही रेल्वे सोडल्या गेल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आली.