अमेरिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या आठवडयात झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तिथल्या जनतेने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांना आपला पुढचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले. पण डोनाल्ड ट्रम्प अजूनही आपला पराभव मान्य करायला तयार नाहीयत. उलट ते तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेतील महत्त्वाच्या पदांवर आपल्याला अनुकूल ठरणाऱ्या निष्ठावान माणसांची निवड करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. तिथल्या प्रमुखाला हटवून त्याच्या जागी आपल्याशी निष्ठावान असणाऱ्यांची निवड केली आहे. यात भारतीय अमेरिकन वंशाचे काश पटेल यांचा सुद्धा समावेश आहे. पेंटागॉन ही अमेरिकेची सर्वोच्च संरक्षण संस्था आहे. इथून महत्त्वाचे लष्करी, रणनितीक निर्णय घेतले जातात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पेंटागॉनमध्ये केल्या गेलेल्या या बदलांकडे बंडाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

आणखी वाचा- ट्रम्प पराभव कबूल करीत नसल्याने अध्यक्षीय परंपरेत बाधा – बायडेन

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी बायडेन प्रशासनाकडे सत्ता हस्तांतराची शक्यता फेटाळून लावली. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाचा आपला दुसरा कार्यकाळ सुरु करतील असे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत घोटाळा झाला आहे. बायडेन आणि डेमोक्रॅटसनी हा घोटाळा केलाय, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. आपणच ही निवडणूक जिंकलोय असा ट्रम्प यांचा दावा आहे.

आणखी वाचा- फक्त मुंबईच नाही नागपूरशीही जो बायडन यांचं खास नातं.. जाणून घ्या!

डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी सुरु असतानाच न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयानेही त्यांचे दावे फेटाळून लावले. जगातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा बायडेन-हॅरिस जोडीला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रम्प आपल्या भूमिकेवर कायम राहिले, तर पुढच्या काही दिवसात अमेरिकेत मोठा तणाव निर्माण होईल.