चीनमधील एका जोडप्याला राष्ट्रीय स्तरावरील दोन मुलांसंदर्भातील धोरणांचे उल्लंघन केल्याप्र्करणी दंड ठोठावण्यात आला आहे. दोन मुलांच्या धोरणांचा नियम मोडून तब्बल सात मुलांना जन्म देणाऱ्या या दांपत्याला दंड म्हणून मोठी रक्कम सामाजिक सहकार्य निधी म्हणून भरावी लागली आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार या दांपत्याने सात मुलांना जन्म दिल्याप्रकरणी त्यांना एक लाख ३५ हजार येन म्हणजेच एक कोटी रुपयांहून अधिक निधी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत. ३४ वर्षीय व्यावसायिक असणाऱ्या ज्हांग रोंगरोंग आणि त्यांचे ३९ वर्षीय पती यांना दा दंड ठोठावण्यात आलाय. या दांपत्याला पाच मुलं आणि दोन मुली आहेत. चीनमधील सरकारी नियम मोडल्याप्रकरणी या दांपत्याने ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम दिली नसती तर या दांपत्याची पहिली दोन मुलं वगळता इतर पाच मुलांना कोणतेही सरकारी कागदपत्रं आणि ओळखपत्र देण्यात आली नसती.

नक्की वाचा >> जन्मदर घटल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता; चीन लोकसंख्येसंदर्भातील कायदा बदलणार

ज्हांग या सौंदर्यप्रसादने, दागिणे आणि कापडांसंदर्भातील उद्योजिका आहेत. त्यांची कंपनी दक्षिण पूर्व चीनमध्ये आहेत. ज्हांग यांनी पोस्टला दिलेल्या माहितीनुसार, दोनपेक्षा अधिक मुलं असावी अशी खूप आधीपासून इच्छा होती. मला एकटेपणाची खूप भीती वाटते. मला कधीच एकटं रहावं लागू नये अशी माझी इच्छा आहे. माझे पती व्यापारानिमित्त अनेकदा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. माझी दोन्ही मोठी मुलं शिक्षणासाठी दुसऱ्या शहरांमध्ये आहेत. माझी लहान मुलं आता माझ्यासोबत राहतात. आम्हाला सात मुलं असून यापुढे आम्हाला आणखीन मुलं नकोयत, असंही ज्हांग यांनी म्हटलं आहे.

या मुलांच्या जन्माआधीच आम्ही आमची आर्थिक परिस्थिती योग्य असेल यासंदर्भातील पावले उचलण्यास सुरुवात केली होती. या मुलांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी आम्ही सक्षम असलो पाहिजे असं आमचं आधीपासून ठरलं होतं. चीनमध्ये १९७९ पासून वन चाइल्ड पॉलिसी सुरु करण्यात आली. सन २०१५ मध्ये म्हणजेच ३६ वर्षांनंतर चीनने वन चाइल्ड पॉलिसीमध्ये सूट देत टू चाइल्ड पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला.

चीनमधील वन चाइल्ड पॉलिसीमुळे येथील जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी झालाय. दर हजार लोकांमागे १० मुलं एवढा कमी जन्मदर २०१९ मध्ये चीनमध्ये होता. ७० वर्षांमधील हा सर्वात कमी जन्मदर आहे. अनेक तज्ज्ञांनी यासंदर्भात इशारा दिला असून चीनमधील लोकसंख्येमधील समतोल बिघडत असल्याचे म्हटले आहे. वयस्कर लोकांची संख्या वाढत असून जन्मदर घटत असल्याने त्याचा आर्थिक विकासावरही परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार मागील वर्षी एका दांपत्याची बँक खाती गोठवण्यात आली होती. या दांपत्याने तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना ४५ हजार डॉलर म्हणजेच ३२ लाख रुपये दंड ठोठावला होता.