एका प्रेमी युगुलाने प्रेमाच्या आणाभाका घेत आत्महत्या करण्याचे ठरवले. मात्र त्यांचा हा निर्णय फसला, आत्महत्येच्या प्रयत्नानंतर या दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर या प्रेमी युगुलाने रूग्णालयातच लग्न केले. रुग्णालयात चक्क लग्न लागल्याने या दोघांची चर्चा होते आहे. तेलंगणमधील हैदराबादपासून काही अंतरावर असलेल्या बरेलीमध्ये ही घटना घडली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार रेश्मा (वय १९) आणि तिचा बॉयफ्रेंड नवाझ (वय २१) या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम आहे म्हटल्यावर घरातल्यांचा विरोध होणे स्वाभाविकच होते. दोन वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती रेश्माच्या घरातल्यांना मिळाली. त्यांनी या सगळ्याला विरोध दर्शवला. या सगळ्यामुळे वैतागून जात रेश्माने पेस्ट्रीसाईड प्यायले. ज्यामुळे रेश्माला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही गोष्ट नवाझला समजली तेव्हा तो तिला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला. त्यानेही तिथे पेस्ट्रीसाइड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर या दोघांनाही उपचारासाठी एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुलीने आणि मुलाने पाठोपाठ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या दोघांच्या घरातल्यांना क्रॉफर्ड मिशन रुग्णालयाने समन्स पाठवले. यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांचे समुपदेशन रुग्णालयातील काही डॉक्टरांनी केले. ज्यानंतर रेश्मा आणि तिचा बॉयफ्रेंड नवाज या दोघांचाही विवाह रुग्णालयातच करण्यात आला. रूग्णालयात लग्न लागल्याच्या बातमीची चर्चा हैदराबादमध्ये चांगलीच रंगली आहे.