नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आणि अहमदाबाद येथील बिगरशासकीय संघटनेचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी आपापसातील मतभेद मिटवावे आणि १२ वर्षांपूर्वी एकामेकांविरुद्ध केलेला बदनामीचा खटला मागे घ्यावा, असा सल्ला दिल्ली न्यायालयाने गुरुवारी सदर दोघांना दिला.
मेधा पाटकर आणि व्ही. के. सक्सेना यांनी एकत्र चर्चा करून एकमेकांमधील मतभेद मिटवावेत, असे महानगर दंडाधिकारी दीपक वासन यांनी सांगितले. दोघांनी कोणता निर्णय घेतला आहे त्याची माहिती आपल्यापुढे या खटल्याच्या पुढील सुनावणीच्या दिवशी म्हणजेच ६ एप्रिल रोजी स्पष्ट करावी, असेही वासन यांनी म्हटले आहे.
पाटकर आणि सक्सेना यांनी एकमेकांविरुद्धचे खटले मागे घेणे उचित ठरेल अशा निष्कर्षांप्रत आपण आलो आहोत. आपण दोघे तडजोड का करीत नाहीत, अशा प्रकारच्या फौजदारी खटल्यांमध्ये आपण का अडकून पडला आहात, असा सवालही न्यायालयाने केला आहे.