शारदा चिटफंड घोटाळा
शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी व तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन मित्रा यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ डिसेंबपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सुगतरॉय चौधरी यांनी मित्रा यांची कोठडी आणखी चौदा दिवसांनी वाढविण्याचे आदेश दिले.
या वेळी मित्रा यांनी जामिनासाठी अर्ज न करता आपल्याला पहिल्या श्रेणीचा कैदी म्हणून मान्यता देण्याची आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात ते वाहतूकमंत्री होते. जामीन रद्द झाल्यानंतर ते २० नोव्हेंबर रोजी न्यायालयाला शरण आले. त्यांच्यासोबतच घोटाळ्याचा सूत्रधार सुदिप्ता सेन याचे जवळचे सहकारी शंतनू घोष आणि अिरदम दास यांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. संगणकनिर्मिती व्यवसायात असलेल्या घोष याने व्यवसायासाठी शारदा कंपनीकडून घेतलेले कर्ज बुडविले. तर, फसव्या योजना लोकांच्या गळी मारून त्यांना लुबाडल्याचा आरोप दास याच्यावर आहे.