दिल्ली न्यायालयाने सोमवारी व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या हेलिकॉप्टर घोटाळयातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलची सीबीआय कोठडी आणखी पाच दिवसांनी वाढवली. याआधी पाच डिसेंबरला न्यायालयाने मिशेलला पाच दिवसांची कोठडी सुनावली होती. ख्रिश्चिअन मिशेल चौकशीत अजिबात सहकार्य करत नसून उत्तरे देण्यास टाळाटाळ करत आहे असे सीबीआय वकिलांनी कोर्टाला सांगितले.

मिशेलने जामिनासाठी अर्ज केला आहे. मूळ ब्रिटीश नागरिक असलेल्या ख्रिश्चिअन मिशेलचे चार डिसेंबरला सौदी अरेबियाने कुठल्याही अटी-शर्तीशिवाय भारताला प्रत्यार्पण केले. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळयातील तीन मध्यस्थांपैकी ख्रिश्चिअन मिशेल एक आहे.

ख्रिश्चिअन मिशेलने संपुआ सरकारमधील कुठलाही नेता किंवा संरक्षण मंत्रालयातील कुठल्याही अधिकाऱ्याला लाच दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ख्रिश्चिअनचे हस्ताक्षर असलेल्या चिठ्ठयांमध्ये पैसे दिल्याचा उल्लेख आहे पण आता त्याने मी डिस्लेक्सिक आजाराचा रुग्ण असून लिहू शकत नाही असा दावा केला आहे. ज्या चिठ्ठयाांमध्ये राजकीय नेते आणि नोकरशहांना पैसे दिल्याच्या नोंदी आहेत त्या गुइडो हास्चके या युरोपियन मध्यस्थाने लिहिल्याचा दावा त्याने केला आहे.

ख्रिश्चिअन मिशेल या लाच प्रकरणाची जबाबदारी गुइडो हास्चकेवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन त्याला स्वत:ला आणि भारतात ज्यांच्याबरोबर त्याचे संबंध आहेत त्यांना वाचवता येईल असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. त्याला सर्वकाही माहित आहे पण आमच्या प्रश्नांना तो त्याच्या इच्छेनुसार उत्तर देत आहे. आमच्याकडे काही व्यवहारांची कागदपत्रे असल्याचे समजल्यानंतर तो थोडा आक्रमक झाला असे अधिकाऱ्याने सांगितले.