खंडणी प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपावरून राज्य पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या खटल्यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा विश्वजीत राणे यांना पणजी येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
राणे आणि त्यांच्या मुलाला एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दाहेज मिनरलचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र नाईक यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी ‘एसआयटी’ने खटला दाखल केला होता. खनिकर्म प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी राणे पितापुत्रांनी खाणमालकाकडे सुमारे सहा कोटी रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भातील सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
तीन वर्षांपूर्वी लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली दोघांविरोधात एसआयटीने ३ जुलै रोजी खटला दाखल केला होता. या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी राणे पितापुत्रांना चौकशीसाठी अद्याप बोलावलेले नाही. राणे गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत.
त्यांनी आरोपांचे खंडन केले होते. आपण एकदाही नाईक यांना भेटलो नव्हतो. नाईक कोण आहेत, मला माहीत नाही. माझ्याविरोधात त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.