उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न्यायालयाने झटका दिला आहे. १९ वर्षे जुन्या हत्येप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना नोटीस जारी केली आहे. नोटिशीचे उत्तर देण्यासाठी त्यांना एक आठवड्याची वेळ देण्यात आली आहे. फेब्रुवारी १९९९ मधील गोरखपूर येथे समाजवादी पक्षाच्या एका नेत्याच्या सुरक्षा रक्षकाच्या हत्येशी निगडीत हे प्रकरण आहे. स्मशानभूमी आणि तलावाच्या जमिनीवरुन दोन गटात वाद झाला होता.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार समाजवादी पक्षाचे तत्कालीन नेते तलत अजीज यांचे खासगी सुरक्षा रक्षक प्रकाश यादव यांची महाराजगंज येथ आंदोलनादरम्यान हत्या करण्यात आली होती. अजीज यांच्या जेलभरो आंदोलनादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली एका गटाने कथितरित्या हवेत गोळीबार केला होता. यापूर्वी हे प्रकरण पुन्हा सुरू करण्यासंबंधी दाखल करण्यात आलेली याचिका मार्च २०१८ मध्ये पुराव्याअभावी सत्र न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर अजीज यांनी लखनऊ उच्च न्यायालयात पुनर्याचिकादाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरू करण्यास सांगितले.

आपल्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडण्यात आली होती, असा आरोप तलत अजीज यांनी केला होता. तत्कालीन भाजपा सरकारने सीबीसीआयडीकडे तपास सोपवला होता. सीबीसीआयडीने याप्रकरणी आपला अहवाल सोपवला आहे. या प्रकरणात गोळी कोणत्या बाजूने आली हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही लोकांना जाणूनबुजून वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजीज यांच्याकडून करण्यात आला आहे.