टू जी परवान्यांच्या सदोष वाटपातून झालेल्या घोटाळ्याच्या खटल्यात रिलायन्स एडीए ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना न्यायालयात साक्षीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
या प्रकरणी आणखी १७ जणांची साक्ष नोंदविण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय गुप्तचर आयोगाने दिल्ली न्यायालयाला केली होती, ही विनंती मान्य करीत सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी या खटल्यातील सर्व आरोपींना तसेच अनिल अंबानी व टीना अंबानी यांना तीन जुलै रोजी साक्षीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस गुरुवारी बजावली. या खटल्यातील आरोपींनी तसेच नव्याने नोटिसा बजावलेल्या साक्षीदारांनी तीन जुलैला आपले जबाब नोंदवावेत, असा आदेश न्यायालयाने दिला.
टू जी खटल्यात रिलायन्स ग्रुपचे गौतम दोशी, हरी नायर व सुरेंद्र पिपारा हे अधिकारी आरोपी आहेत. शाहीद बलवा आणि विवेक गोयंका हे प्रवर्तक असलेली स्वान टेलिकॉम प्रा. लि. कंपनी ही खरे तर रिलायन्सचीच तोतया कंपनी होती, असे सीबीआयने म्हटले आहे. अनिल अंबानी यांच्या नियोजित साक्षीमुळे या खटल्याला अधिक बळकटी येईल, असा दावाही सीबीआयने केला.