नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणी सर्व कागदपत्रे मिळावीत यासाठी दाखल केलेल्या अर्जावर दिल्लीच्या न्यायालयाने शनिवारी सक्तवसुली संचालनालयाला नोटीस जारी केली  आहे.

विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांनी सक्तवसुली संचालनालयाला नोटीस जारी के ली असून ९ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.  चिदंबरम यांच्या वतीने दाखल केलेल्या  अर्जात म्हटले होते,की सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणाचे आरोपपत्र व इतर कागदपत्रे द्यावीत. नोंदीतील कागदपत्रात क्रमांक चुकले आहेत ती चूकही दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली असून त्यातील गहाळ कागदपत्रे देण्याची मागणी केली आहे.

चिदंबरम यांना सीबीआयने आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी २१ ऑगस्ट २०१९ रोजी अटक केली होती, त्याच वर्षी १६ ऑक्टोबरला त्यांना सक्तवसुली संचालनालयाने काळ्या पैशाच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सहा दिवसांनी २२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता.