लोकप्रिय सोशलनेटवर्किंग संकेतस्थळावर ईश्वरनिंदा करणारे पोस्ट टाकण्यात आल्याने हल्ला झालेल्या हिंदू कुटुंबीयांना ४.३४ दशलक्ष टका इतकी नुकसानभरपाई देण्याचा आदेश बांगलादेश न्यायालयाने दिला आहे.
उप महाधिवक्ता विश्वजित रॉय यांनी सांगितले की, काही अज्ञात व्यक्तींनी गेल्या नोव्हेंबरमध्ये पवना जिल्ह्य़ातील बोनोग्राम बाझार भागात गुंडागर्दी करून २९ घरे, १० दुकाने व सात मंदिरे यांची नासधूस केली होती. त्याआधी अल्पसंख्य हिंदू समाजाने महंमद पैगंबर यांच्याविषयी  बदनामीकारक पोस्ट फेसबुकवर टाकले होते. उच्च न्यायालयाचे न्या. काझी रेझा उल हक व ए बीएम अल्ताफ हुसेन यांनी सरकारला आदेश दिला की, संबंधित कुटुंबीयांना तीन आठवडय़ात भरपाई देण्यात यावी. न्यायालयाने या हल्ल्यांना जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्याचे आदेशही दिले आहेत. चौकशी समितीने नुकसानीचा जो अंदाज दिला आहे त्यानुसार ४.३४ दशलक्ष टका (१ डॉलर म्हणजे ७८ टका) इतकी भरपाई सरकारला द्याली लागणार आहे, असे रॉय यांनी डेली स्टार वृत्तपत्राला सांगितले. नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सरकारने चौकशी समिती नेमली होती. या समितीने ४.३४ दशलक्ष टका इतके मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज दिला होता. हा अहवाल न्यायालयाला गेल्या आठवडय़ात सादर केला होता. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने हा आदेश मंजूर केला आहे.