पोलीस महानिरीक्षक अमिताभ ठाकूर यांना धमकावल्याच्या आरोपाखाली स्थानिक न्यायालयाने समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याप्रकरणी चौकशीत कुठलीही उणीव राहता कामा नये असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायदंडाधिकारी सोम प्रभा यांनी धमकीप्रकरणी ठाकूर यांचा तक्रार अर्ज स्वीकारला. भारतीय दंड विधान १५६ नुसार न्यायदंडाधिकारी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश देऊ शकतात. ठाकूर यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जात मुलायमसिंह यांच्यावर भारतीय दंड विधान ५०६ नुसार कारवाई करण्याची मागणी केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी मुलायमसिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात नकार दिल्यावर ठाकूर यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. मुलायमसिंह यांनी फोनवरून धमकावल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.
हझरतगंज पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी विजयमल सिंह यांनी पुराव्याअभावी मुलायमसिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे ठाकूर यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात आला.