भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँला पोलीस सुरक्षा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. हसीन जहाँने सोशल मीडियावर करणाऱ्या पोस्टसाठी काही लोक धमकावत असल्याचा आरोप केला आहे. यानंतर कोर्टाकडून हे आदेश देण्यात आले असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

हसीन जहाँने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हसीन जहाँचे वकील आशिष चक्रवर्ती यांनी तक्रार दाखल करुनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमितेश बॅनर्जी यांनी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून तपास सुरु असल्याची माहिती दिली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने पोलिसांना हसीन जहाँ यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा आदेश दिला. त्यांना तसंच त्यांच्या संपत्तीला काही नुकसान होता कामा नये असं कोर्टाने सांगितलं आहे. यावेळी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे काय कारवाई करण्यात आली यासंबंधी अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आलं. चार आठवड्यांनी पुन्हा एकदा याप्रकरणी सुनावणी होणार आहे.