आपल्या ज्युनिअरची हत्या केल्याप्रकरणी १९ वर्षीय आरोपीला आपलं उर्वरित आयुष्य कारागृहात घालवावं लागणार आहे. आरोपीने १७ वर्षीय तरुणीची हत्या केली होती. विशेष म्हणजे तरुणीने लिहिलेली एक कविता न्यायालयात मुख्य पुरावा ठरली. न्यायालयाने दोन पुरावे यावेळी ग्राह्य धरले. पहिली म्हणजे तरुणीने लिहिलेले कविता आण दुसरं युट्यूब गाणं ज्यामध्ये तरुण आपल्या प्रेयसीची हत्या करताना दाखवण्यात आलं होतं.

न्यायालयाने आरोपी सार्थक कपूर दोषी असून त्याला कोणत्याही किंमतीवर तरुणीला मिळवायचं होतं असं स्पष्ट होत असल्याचं म्हटलं आहे. युट्यूब गाणं पाहिल्यानंर न्यायालयाने सांगितलं की, यावरुन मारेकऱ्याचा हेतू काय होता आणि त्याने तेच केलं हेदेखील स्पष्ट होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अगदी त्याचप्रमाणे तरुणीवर वार करतो ज्याप्रमाणे गाण्यात दाखवण्यात आलं आहे. निर्णय सुनावताना पीडित तरुणीने लिहिलेली कविताही न्यायालयात सादर करण्यात आली. हत्या होण्याआधीपासूनच तरुण पीडित तरुणीला त्रास देत असल्याचं कवितेतून समोर येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत दोन लाखांचा दंडही सुनावला. निर्णय सुनावताना न्यायालयाने सांगितलं की, ‘हा एक सुनियोजीत कट होता. आरोपीने इन्स्टाग्रामवर आपल्या उद्देशांचा उल्लेख केला होता आणि धारदार शस्त्राने तरुणीची हत्या केली’.

बारावीत शिकणाऱ्या श्रेयाचा गतवर्षी १६ ऑगस्टला मृतदेह सापडला होता. कोचिंग क्लासवरुन घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी सार्थकने आपला गुन्हा कबूल केला होता.