विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेसाठीच्या संघात मुलाच्या निवडीसाठी २५ लाख रुपये दिल्याचे वक्तव्य द्वेषमूलक हेतूने करण्यात आले असून ते खोटे आहे, त्यामुळे आमची बदनामी झाली आहे, अशी फिर्याद १९ वर्षे वयाखालील क्रिकेटपटूच्या वडिलांनी भाजप खासदार कीर्ती आझाद, बिशनसिंग बेदी व इतर दोन जणांविरुद्ध दाखल केली असून दिल्ली न्यायालयाने त्याची दखल घेण्याचे मान्य केले आहे.
महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी सांगितले की, मुलाच्या वडिलांनी दाखल केलेली मानहानीची फिर्याद दाखल करून घेण्यात येत असून या प्रकरणी २२ फेब्रुवारीला सुनावणी करण्यात येईल. क्रिकेटपटू हिंमत सिंह याचे वडील तेजबीर सिंह यांच्या वतीने वकील गजेंदर सिंह यांनी सांगितले की, क्रिकेटपटू बेदी, कीर्ती आझाद व इतरांनी पत्रकार परिषदेत मुलाच्या निवडीसाठी २५ लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता तो खोटा असल्याचा दावा केला.