टूलकिट प्रकरणात अटकेत असलेल्या दिशा रवीच्या जामिन अर्जावर शनिवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. दिशा रवी खलिस्तान समर्थक संघटनेशी संबंधित असल्याचे सांगून दिल्ली पोलिसांनी तिच्या जामीन अर्जाला विरोध केला.

या प्रकरणात दोन वाजता सुनावणी सुरु झाली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही.राजू यांनी टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांच उत्तर वाचून दाखवलं. खलिस्तान समर्थक संघटना पोएटिक जस्टिस फाऊंडेशनने आपल्या उद्देशासाठी समर्थन मिळवलं आणि दिशा रवी खूप जवळून या संघटनेच्या संपर्कात होती. पीजेएफने झूम मिटिंगही आयोजित केली होती असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही.राजू यांनी न्यायालयात सांगितले.

पर्यावरणवादी दिशा रवीच्या जामिन अर्जावर तीन तास सुनावणी सुरु होती. दिल्ली न्यायालय दिशा रवीच्या जामिन अर्जावर मंगळवारी निर्णय देणार आहे.

या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तो पर्यंत दिल्ली सोडणार नाही, हे दिशा रवी लिहून द्यायला तयार आहे, असे दिशा रवीच्या वकिलाने सांगितले. “२६ जानेवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत १४९ जणांना अटक झाली आहे, ती त्यांच्यापैकी एकाशी तरी बोलली आहे का ?” असा सवाल तिच्या वकिलाने केला. एखादे आंदोलन आपल्याला आवडेल किंवा नाही आवडणार, पण त्यामुळे आपण देशद्रोही ठरत नाही. टूलकिटच म्हणाल, तर टूलकिट जनक्षोभ निर्माण करणारं होतं का? असा सवाल दिशा रवीच्या वकिलाने केला.