‘कोव्हॅक्सिन’ लशीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने दिल्ली सरकारला या लशीच्या ‘जादा’ मात्रा देण्यास नकार दिला असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी सांगितले. यामुळे राजधानीतील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरण मोहिमेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील कोव्हॅक्सिनचा साठा संपला असून परिणामी १७ शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेली सुमारे १०० लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत, असे सिसोदिया यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले.

‘कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नसल्यामुळे, संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार आम्ही ती दिल्ली सरकारला पुरवू शकत नाही, असे या लशीच्या उत्पादकांनी एका पत्राद्वारे कळवले आहे. याचाच अर्थ, केंद्र सरकार लशींचा पुरवठा नियंत्रित करत आहे’, असे ते म्हणाले. लशींच्या गैरव्यवस्थापनाचा दोष केंद्र सरकारला देतानाच, लशींच्या ६.५ कोटी मात्रा विदेशांना पाठवणे ही ‘सर्वात मोठी चूक होती’, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तथापि, राज्यांनी लशी विकत घेण्यात केंद्र सरकारची काही भूमिका असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनी नाकारले.

दिल्ली सरकारने २६ एप्रिलला कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन यांच्या प्रत्येकी ६७ लाख मात्रांची मागणी नोंदवली होती. सरकारच्या आकडेवारीनुसार, १८-४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी त्यांना आतापर्यंत कोव्हॅक्सिनच्या १.५ लाख व कोव्हिशिल्डच्या ४ लाख मात्रा मिळाल्या आहेत. विविध गटांतील लाभार्थ्यांसाठी आतापर्यंत दोन्ही लशींच्या एकूण ४८.७ लाख मात्रा मिळाल्या असल्याचे यात नमूद केले आहे.

‘आमच्या हेतूबाबत काही राज्यांनी तक्रार करणे अतिशय निराशाजनक’

‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या पुरवठ्याबाबत भारत बायोटेकच्या हेतूबद्दल काही राज्ये तक्रार करत असल्याची बाब अतिशय निराशाजनक आहे, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस यापूर्वीच १० मे रोजी १८ राज्यांमध्ये पोहचली आहे, असे ट्वीट कंपनीच्या सह व्यवस्थापैकीय संचालक सुचित्रा एल्ला यांनी केले. ‘छोट्या-छोट्या शिपमेंटमध्ये असेल, पण १८ राज्यांना लस पाठवण्यात आली आहे. तथापि, आमच्या हेतूंबाबत काही राज्ये तक्रार करत असल्याचे ऐकू येत असून हे अतिशय निराशाजनक आहे. कोविडमुळे आमचे ५० टक्के कर्मचारी कामावर नाहीत, तरीही करोनाविषयक टाळेबंदीत आम्ही तुमच्यासाठी दिवसाचे चोवीसही तास काम करतच आहोत’, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. हैदराबादेतील भारत बायोटेक ही कंपनी आंध्र प्रदेश, हरियाणा, ओडिशा, आसाम, जम्मू व काश्मीर, तमिळनाडू, बिहार, झारखंड व दिल्लीसह १८ राज्यांना कोव्हॅक्सिन लस पुरवत आहे.