करोना लशींचे प्रकल्प प्रमुख राचेस एल्ला यांच्याकडून स्पष्ट

‘कोव्हॅक्सिन’ या आपल्या करोना प्रतिबंधक लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची माहिती अद्याप प्रकाशित न करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने ही माहिती शास्त्रीय नियतकालिकांना दिली असून, येत्या २ ते ४ महिन्यांत या लशींचे पुनरीक्षण होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे या कंपनीतील करोना लशींचे प्रकल्प प्रमुख राचेस एल्ला यांनी बुधवारी सांगितले.

कोव्हॅक्सिनबाबत आतापर्यंत ९ निबंध प्रकाशित झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या कार्यक्षमतेबाबतचा निबंध हा दहावा असेल, असे एल्ला यांनी ट्विटरवर लिहिले.

या मुद्द्यावर नि:पक्षपाती राहण्यासाठी भारत बायोटेक किंवा आयसीएमआर यांना कुठल्याही आकडेवारीपर्यंत पोहचता येऊ शकत नाही. आमच्या सेवा पुरवठादाराने अंतिम सांख्यिकी विश्लेषण सुरू केले आहे. कार्यक्षमताविषयक आणि दोन महिन्यांच्या सुरक्षितता कालावधीबाबत सीडीएससीओला माहिती सादर केल्यानंतर, ती प्री-प्रिंट सव्र्हरला जाणे अपेक्षित आहे. पुनरीक्षणाला २ ते ४ महिने लागतात, असेही ट्वीट एल्ला यांनी केले.

एल्ला यांच्या ट्वीटनुसार, २५,८०० स्वयंसेवकांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत भाग घेतला. प्रत्येक स्वयंसेवकांशी संबंधित ३० वेगवेगळे फॉर्म होते व याप्रकारे प्रत्येकाचे वैयक्तिक डेटा पॉइंट्स ७०.४ लाख इतके होतात. अखेरच्या स्वयंसेवकाला मार्चच्या मध्यात दुसरी मात्रा देण्यात आली.