नवी दिल्ली : भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लशीच्या चाचण्या येत्या १०-१२ दिवसांत २ ते १८ वयोगटातील मुलांवर सुरू करण्यात येणार आहेत. करोनाची तिसरी लाट आली तर त्यात मुलांना जास्त धोका आहे, त्यामुळे या लशींच्या चाचण्यांना विशेष महत्त्व आहे.

निती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, कोव्हॅक्सिनच्या चाचण्या मुलांवर करण्यात येणार असून ते २ ते १८ वयोगटातील असतील. मुलांवर चाचण्या करण्यात येणारी ही भारतातील पहिलीच लस आहे.

पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोव्हॅक्सिन लशीच्या २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचण्या करण्यास भारतीय महा औषध नियंत्रकांनी मान्यता दिली आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यात होणार आहेत. या लशीच्या मुलांवरील चाचण्यांना ११ मे रोजी महाऔषध नियंकांनी मान्यता दिली होती. या चाचण्यांना परवानगी देण्याची शिफारस केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या विषय तज्ज्ञ समितीने त्याआधी  केली होती. मुलांवरील चाचण्यांसाठीचा प्रस्ताव भारत बायोटेक कंपनीने फेब्रुवारीतच सादर केला होता. पण त्या वेळी कंपनीला लशीच्या प्रौढांवरील परिणामकारकतेची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. सविस्तर चर्चेनंतर कंपनीला प्रौढांवरील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची माहिती सादर करण्याबरोबरच चाचण्यांचे विश्लेषण करण्यास सांगितले आहे. चाचणीची रचना टप्पा २ व ३ मध्ये बदलण्याची सूचना करण्यात आली आहे.  त्याबरोबरच नमुन्यांच्या आकाराविषयी काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर वैद्यकीय चाचण्या सोपस्कारांवर अंतिम फेरविचार करण्यात आला. सुधारित चाचण्या आराखडा सादर करण्यास कंपनीला २४ फेब्रुवारीच्या बैठकीत  सांगण्यात आले होते.

अमेरिका व कॅनडात फायझर व बायोएनटेक या कंपन्यांनी १२ ते १५ वयोगटातील मुलांवर चाचण्या सुरू करण्यास मंजुरी दिली होती. १४ मे पासून अमेरिकेत १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होत असून फायझरच्या लशीला याच वयोगटासाठी कॅनडात ५ मे रोजी मंजुरी देण्यात आली होती. युरोपीय वैद्यकीय संस्थेने फायझरचा वापर मुलांवर करण्याविषयी मूल्यमापन सुरू केले आहे. भारत बायोटेकच्या चाचण्या ५२५ जणांवर विविध रुग्णालयांत करण्यात येणार आहेत.

माहितीच्या विश्लेषणाची गरज

अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, वेगाने माहिती मिळवून त्यातील फायद्यांचे विश्लेषण करणे ही गोष्ट मुलांवर लशीच्या वापराबाबत गरजेची आहे. मुलांचे लसीकरण करायचे असेल, तर सरकारने योग्य त्या सोपस्कारांची निश्चित करावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती.