कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लसीनंतर आता कोवॅक्सिन या भारत बायोटेक या कंपनीच्या लसींचे दरही कमी करण्यात आले आहे. कोवॅक्सिनचा दर आता २०० रुपयांनी घटला आहे. ही लस आता राज्य सरकारांना ४०० रुपये प्रति डोस या किमतीने मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने कोवॅक्सिनचा वाढीव दर जाहीर केला होता. त्यानुसार राज्य सरकारांना कोवॅक्सिन ६०० रुपये प्रति डोस तर खासगी रुग्णालयांना १२०० रुपये प्रति डोस या किमतीला मिळत होती. मात्र आता या किमतीत घट करण्यात आली आहे.

राज्य सरकारांना आता कोवॅक्सिन ६०० ऐवजी ४०० रुपये प्रति डोस या किमतीने मिळणार आहे. खासगी रुग्णालयांना मात्र या लसीसाठी पूर्वीचीच किंमत म्हणजे १२०० रुपये प्रति डोस ही किंमत मोजावी लागणार आहे.

भारत बायोटेकने एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकात भारत बायोटेकने म्हटलं आहे की, सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन आम्ही आता कोवॅक्सिन ही लस राज्य सरकारांना ४०० रुपये प्रति डोस या किमतीने देणार आहोत.

कालच सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीचे नवे दर जाहीर केले. या नव्या दरांनुसार कोविशिल्ड ही लस राज्य सरकारांना आता ३०० रुपये प्रति डोस या नव्या किमतीने मिळणार आहे. त्यानंतर आता भारत बायोटेकनेही आपल्या कोवॅक्सिन लसीचा दर २०० रुपयांनी कमी केला आहे.