हैदराबादस्थित भारत बायोटेकने विकसित केलेली ‘कोवॅक्सिन’ ही लस चाचणीदरम्यान घेतल्यानंतर हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली असताना याबाबत भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे.

भारत बायोटेकनं निवेदनात म्हटलं, “आमची क्लिनिकल ट्रायल ही दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी २८ दिवस द्यावे लागतात. म्हणजेच कोवॅक्सिन लसीची कार्यक्षमता ही दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर निश्चित केली जाऊ शकते.” हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी कोवॅक्सिन लसीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर भारत बायोटेकने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

कंपनीने पुढे म्हटलं की, “चाचणीचा भाग म्हणून ५० टक्के सहभागींना ही लस मिळाली तर इतरांना प्लेसबो देण्यात आला होता. फेज-३ मधील ट्रायल ही दुप्पट करण्यात आली होती. यामध्ये ५० टक्के सहभागींना लस देण्यात आली तर उर्वरितांना प्लेसबो देण्यात आला.”

अनिल विज यांनी स्वेच्छेने भारत बायोटेकच्या मानवी चाचणीत भाग घेतला होता. यामध्ये २५,००० पेक्षा अधिक लोकांना चाचणी डोसेस देण्यात आले होते. २० नोव्हेंबर रोजी विज यांना हा डोस देण्यात आला होता. ते हरयाणातील करोनाच्या लसीचा डोस घेणारे पहिले व्यक्ती ठरले होते. त्याचबरोबर हरयाणातील ४०० लोकांनाही कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला यामध्ये रोहतकचे पीजीआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ओ पी कार्ला यांचाही समावेश आहे.

रोहतकच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या टीमने अंबाला कॅन्टोन्मेट सिविल हॉस्पिटलमध्ये विज यांना लस दिली होती. त्यानंतर त्यांची प्रकती आणि शरिरातील प्रमुख अवयवांचे निरीक्षण दर आठवड्यांनी केले जात होते.

भारत बायोटेकने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थान (एनआयव्ही) आणि दिल्लीतील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) सोबत एकत्रितपणे करोनावर लस विकसित केली आहे. या कंपनीने आजवर विविध आजारांवर अनेक लस विकसित केल्या आहेत.