भारताची स्वदेशी लस म्हणून मान्यता पावलेली भारत बायोटेकची कोविड १९ प्रतिबंधक लस सुरक्षित असून प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे. त्याचे कुठलेही विपरित सहपरिणाम होत नाहीत, असे शिक्कामोर्तब लॅन्सेट इनफेक्शियस डिसिजेस जर्नलने केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यानंतरच्या संशोधनाचे हे निष्कर्ष आहेत.

या संशोधन अहवालाच्या लेखकांनी म्हटले आहे की, दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये बीबीव्ही १५२ या सांकेतिक नावाच्या लशीची कार्यक्षमता तपासण्यात आली नव्हती. भारत बायोटेकने ही लस भारतीय वैद्यक संशोधन परिषद व पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या सहकार्याने बनवली होती. या लशीला भारत सरकारने आपत्कालीन वापराचा परवाना चाचण्यांची माहिती हाती नसतानाच दिला होता. कोव्हॅक्सिन लशीबाबत अगोदर अनेक शंका निर्माण झाल्या असल्या तरी भारतीय औषध महानियंत्रकांनी या लशीला मान्यता काही अटींच्या अधीन राहून दिली होती. भारत बायोटेक लशीच्या अलिकडच्या अभ्यासानुसार या लशीची परिणामकारकता तिसऱ्या टप्प्यात ८१ टक्के असून त्याचे निष्कर्ष आधीच जाहीर करण्यात आले आहेत. या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रतिकारशक्ती चाचण्या व सुरक्षा चाचण्या बीबीव्ही १५२ या नावाने आरोग्यवान असलेल्या १२ ते ६५ वयोगटातील प्रौढांवर भारतातील नऊ राज्यांतील नऊ रुग्णालयांत करण्यात आल्या. स्नायूत दोन वेळा या लशीची मात्रा २८ दिवसांच्या अंतराने दिल्यानंतर परिणाम तपासण्यात आले. किमान एक मात्रा घेतलेल्यात ही तपासणी ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२० या दरम्यान करण्यात आल्या. त्यात ३८० जणांनी भाग घेतला होता. त्यात दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यात प्रतिकारशक्ती व सुरक्षा चाचण्यात बीबीव्ही १५२ या लशीच्या मात्रा २८ दिवसांच्या अंतराने देण्यात आल्या.

पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष याच नियतकालिकात गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाले असून बीबीव्ही १५२ लस दिलेल्या लोकांमध्ये विषाणूला निष्प्रभ करणारे प्रतिपिंड मोठय़ा प्रमाणात तयार झाले. दुसऱ्या मात्रेनंतर त्या प्रतिपिंडांची संख्या वाढलेली राहिली. दुसऱ्या टप्प्यात बीबीव्ही १५२ लशीने चांगली प्रतिकारशक्ती व सुरक्षा निर्माण केली, पेशी नियंत्रित प्रतिकारशक्ती दोन पद्धतींनी तयार झाली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात जास्त चांगले निष्कर्ष मिळाले. यात रोगजंतू व लसीकरणातून आलेल्या अँटीजेनमुळे प्रतिकारशक्ती तयार होते म्हणजे दोन मार्गानी ही प्रक्रि या घडत असते.

कोव्हॅक्सिन ही लस रासायनिक प्रक्रिया केलेल्या करोना विषाणू नमुन्यापासून तयार केली असून त्यामुळे या विषाणूंची संख्या शरीरात वाढत नाही. दोन मात्रा तीन आठवडय़ांच्या अंतराने दिली असता लशीतील विषाणू प्रथिने क्रियाशील बनून प्रतिकारशक्ती वाढवतात व पुढील संसर्गाला तोंड देण्यास शरीराला सज्ज करतात.

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची प्रतीक्षा

लॅन्सेटने म्हटले आहे की, या अभ्यासात कार्यक्षमता पातळीवर अभ्यास करण्यात आला नसून सुरक्षेचे मूल्यमापन करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची गरज आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्याची तुलना करताना दुसऱ्या टप्प्यातील परिणामकारकता अधिक होती. याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील व्यक्तींना पहिल्या टप्प्यातील व्यक्तींपेक्षा कमी सहदुष्परिणामांना सामोरे जावे लागले. १२ ते १८ तसेच ५५ ते ६५ वयोगटातील व्यक्तींनी या अभ्यासात सहभाग नोंदवला. मुलांमध्ये व ६५ वर्षांवरील व्यक्तीत या लशीची परिणामकारकता तपासण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे, असे अहवालात म्हटले आहे.