निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सलग दुसऱ्यादिवशी नऊ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोना व्हायरसमुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारत इटलीला मागे सोडून करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये दोन लाख ३४ हजार ५३१ रुग्णांना करोनाची बाधा झाली होती. भारतात हीच संख्या दोन लाख ३६ हजार ११७ आहे. भारतात करोना चाचणीचा वेग वाढल्यामुळे रुग्ण संख्या देखील वेगाने वाढत आहे.

महाराष्ट्रात करोनामुळे शुक्रवारी सर्वाधिक १३९ मृत्यू झाले. दिल्लीमध्ये ५८, गुजरातमध्ये ३५, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ आणि बंगालमध्ये ११ मृत्यू झाले.

राज्यात २४ तासांत २४३६ रुग्णांची नोंद
राज्यात शुक्रवारी करोनाच्या २४३६ नव्या रुग्णांचे निदान झाले. राज्यात एकूण ८०,२२९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. आज १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २८४९ जणांचे बळी गेले आहेत. सध्या राज्यात शासकीय आणि खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे.

“लॉकडाउन फेल झाला”; राहुल गांधींनी ट्विट केला स्पेन, जर्मनीसह भारताचा आलेख
राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख ट्विट केला आहे. या राष्ट्रांमध्ये संख्या वाढत असताना लॉकडाउन लागू करण्यात आला. मात्र, लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संख्या कमी होताना दिसत आहे. भारतात रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाउन हटवण्यात आला आहे. असं या आलेखातून दिसते. या आलेखांबरोबर राहुल गांधी यांनी “हे अपयशी झालेल्या लॉकडाउनसारखं दिसत आहे,” असं म्हटलं आहे.