करोना व्हायरस हे मागच्या सहा वर्षातील नरेंद्र मोदी सरकार समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शनिवारी म्हणाले. ते आज तक वृत्त वाहिनीवर बोलत होते.

“भारत सुदैवी आहे, करोनाच्या संकटावर मात करु शकणारा नेता आज आपल्याजवळ आहे. पंतप्रधान मोदींचा योग्य विचार आणि वेळीच निर्णय घेतला नसता, तर परिस्थिती खूप वाईट असती. अमेरिकेत करोना व्हायरसमुळे काय स्थिती आहे ते आपण पाहू शकतो” असे राजनाथ सिंह म्हणाले. “सरकारने विचार न करता लॉकडाउनचा निर्णय घेतला हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. लॉकडाउनचा निर्णय धाडसी होता आणि तो योग्य वेळी घेण्यात आला” असे राजनाथ म्हणाले.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात संरक्षण मंत्रालयाने वर्षभरात काय-काय साध्य केले? त्यावर बोलताना राजनाथ सिंह यांनी सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाचे उदहारण दिले. सीडीएस या पदाची निर्मिती ही महत्वपूर्ण कामगिरी असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

मागच्यावर्षी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना पंतप्रधान मोदींनी सीडीएस या पदाच्या निर्मितीची घोषणा केली होती. माजी लष्करप्रमुख बीपिन रावत भारताचे पहिले सीडीएस आहेत. तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे.