भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. यावेळी त्यांनी कोणाचाही थेट उल्लेख न करता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर टीका केली आहे. सध्याच्या काळात काँग्रेसचं वागणं चुकीचं असून दुखावणारं असल्याचं ते म्हणाले आहेत. पण यामुळे आश्चर्य वाटत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका करण्यात आल्यानंतर जे पी नड्डा यांनी हे पत्र लिहिलं आहे.

काँग्रेसने पराभवातून धडा घेण्याची गरज- सोनिया

“सध्याच्या काळात काँग्रेसचं वागणं दुखावणारं आहे, पण आश्चर्य वाटण्यासारखं नाही. तुमच्या पक्षातील काही सदस्य लोकांना मदत करत कौतुकास्पद कामगिरी बजावत असताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून नकारात्मकता पसरवत त्यांच्या कठोर मेहनतीला ग्रहण लावलं जात आहे,” अशी टीका जे पी नड्डा यांनी केली आहे.

“आजच्या घडीला जेव्हा भारत करोनाविरोधात अत्यंत शौर्याने लढत आहे, प्रत्येकाची इच्छा असेल की काँग्रेसच्या वरिष्ठांनी लोकांची दिशाभूल करणं, खोटी दहशत पसरवणं आणि फक्त राजकीय विचारांच्या आधारे विरोधाभास निर्माण करणाऱ्या भूमिका घेणं बंद करावं,” असं जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे.

“भाजपा आणि एनडीएचं सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये गरीब व वंचितांना मोफत लस देऊन मदत करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. मला खात्री आहे की, अनेक राज्यांमध्ये असणाऱ्या काँग्रेस सरकारलाही गरिबांबद्दल असंच वाटत असावं. तेदेखील मोफत लस देण्याचा असा निर्णय घेऊ शकतात का?,” अशी विचारणा जे पी नड्डा यांनी केली आहे.

चुकांबद्दल मोदींनी प्रायश्चित्त घ्यावे!
काँग्रेसच्या कार्यकारी समितीने करोना संकटाच्या सदोष हाताळणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि त्यांनी चुकांबद्दल प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणी केली.

पंतप्रधान मोदी यांनी आपला वैयक्तिक कार्यक्रम राबवण्याऐवजी झालेल्या चुकांबद्दल प्रायश्चित्त घ्यावे आणि नागरिकांच्या दु:खाची जाणीव ठेवून त्यांची सेवा करावी, असा ठराव काँग्रेसच्या कार्यकारी समितीने केला.

सरकार जाहीर करीत असलेले करोना रुग्णांचे आकडे आणि मृतांची संख्या याबद्दलही या ठरावात शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्याचबरोबर मृतांचे खरे आकडे जाहीर केले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ‘आव्हानांशी सामना करण्यात उपाय सामावलेला असतो, मृतांचे आकडे आणि रुग्णांची संख्या दडवून सत्य लपवण्यात नाही,’ असा टोलाही ठरावात लगावण्यात आला आहे.

केंद्राच्या लसीकरण धोरणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना लशींचा पुरवठा अत्यंत अपुरा असून लशींच्या किमतीबद्दलचे धोरण अपारदर्शक आणि भेदभाव करणारे होते, असा आरोपही काँग्रेसच्या कार्यकारिणीने केला.

काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सूरजेवाला म्हणाले, की ही वेळ राष्ट्रीय एकात्मता, संकल्प आणि आपल्या उद्दिष्टांप्रति दृढ भावना दर्शवण्याची आहे. मृतांची आकडेवारी अत्यंत चुकीची असून त्यात मृत्यूची मोठय़ा प्रमाणावर नोंदच केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

करोना साथीची दुसरी लाट कोणत्याही गंभीर आपत्तीपेक्षा कमी नाही आणि मोदी सरकारच्या असंवेदनशील, उदासीन, अक्षमतेचा तो परिणामआहे, असा आरोपही दोन्ही नेत्यांनी केला. मोदी सरकारच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमाच्या धक्कादायक कृतीबद्दल काँग्रेस कार्यकारिणीने खेद व्यक्त केल्याचेही सूरजेवाला यांनी सांगितले.