करोनाचं संकट दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी आणखी गंभीर होताना दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इतर पहिल्या दहा देशांच्या तुलनेत भारतात करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. इतकंच नाही तर दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. देशात सातत्यानं ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, देशातील राज्यात ही संख्या जास्त आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

करोनाचा उद्रेक झालेल्या जगातील देशांच्या भारत सध्या तिसऱ्या क्रमांकांवर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशातील बाधित रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक वेगानं वाढत आहे. करोनाचा प्रचंड फटका बसलेल्या अमेरिकेचा रुग्णवाढीचा दर सध्या ४० दिवसांवर गेला आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ३६ दिवसांवर आहे. मात्र, भारतात १९ दिवसातच रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून भारतात दिवसाला ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, दिवसभरात सर्वाधिक रुग्णांच्या उच्चांकी नोदींपासून भारत केवळ ५ हजारांनी दूर आहे.

भारतातील करोना रुग्णांची संख्या १४ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. तर ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चार राज्यांमधील रुग्णांची संख्या मोठी आहे. देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून नऊ हजार ते दहा हजारांच्या सरासरी रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी यात कमालीची घट झाली. राज्यात ७ हजार ९२४ रुग्ण आढळून आले. दरम्यान राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ३ लाख ८३ हजार ७२३ वर पोहोचला आहे.