देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अजूनही टळलेला नसला तरी ही लाट आता ओसरताना दिसत आहे. देशातल्या बरे होणाऱ्या करोना रुग्णांची संख्या सातत्याने नव्या करोनाबाधितांपेक्षा जास्तच आहे. देशातला करोना मृत्यूदरही खालावताना दिसत आहे. मात्र तरीही देशवासियांनी काळजी घेण्याची आणि करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करण्याची गरज आहे. एक नजर टाकूया देशातल्या करोनाच्या आकडेवारीवर….

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात एक लाख २० हजार ५२९ नव्या करोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १५ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली आहे. तर देशात काल दिवसभरात एक लाख ९७ हजार ८९४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.३८ टक्के झाला आहे.


देशात काल दिवसभरात ३,३८० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा आता तीन लाख ४४ हजार ८२ वर पोहोचला आहे. देशातला सध्याचा करोना मृत्यूदर १.२० टक्के आहे.

करोना विषाणू साथीची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे नमूद करीत ३७७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली. ७ मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येने शिखर गाठले होते, परंतु आता त्यांत ६८ टक्क्यांनी घट झाल्याचेही सांगण्यात आले. त्याचबरोबर लसीकरणात प्रौढांना प्राधान्य देण्यात येणार असून लहान मुलांबाबत तातडीने निर्णय होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.

आणखी वाचा- करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण

शंभराहून अधिक दैनंदिन रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्यांची  संख्या २९ एप्रिल ते ५ मे या आठवड्यात ५३८ होती,  ती आता २५७ पर्यंत खाली  आली आहे. त्या आठवड्यात संसर्गदर २१.६२ टक्के होता, तो आता ७.२७ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत हा दर ६.४ टक्के होता, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी सांगितले. शिवाय, देशातील ६६ टक्के नवी रुग्णसंख्या फक्त पाच राज्यांपुरती मर्यादित राहिली आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही १० मेपासून २१ लाखांहून अधिक घट झाली असून ३७७ जिल्ह्यांमधील संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचेही अगरवाल यांनी नमूद केले.