तामिळनाडूमधील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. याचदरम्यान राज्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका गरोदर महिला डॉक्टरचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आठ महिन्यांची गरोदर असणारी ही महिला डॉक्टर आणि दोन नर्सचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झालाय. राज्यातील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १५ हजारांहून अधिक झालीय.

३२ वर्षीय महिला डॉक्टर असणाऱ्या शनमुगप्रिया या अनुपानंद सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करोना ड्युटीवर कार्यरत होत्या. आठ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या शनमुगप्रिया केंद्रावर येणाऱ्या रुग्णांची करोना चाचणी करण्याचं काम पहायच्या. गरोदर असल्याने त्यांना शनमुगप्रिया यांनी करोनाची लस घेतली नव्हती. अस्वस्थ वाटू लागल्याने दहा दिवसांपूर्वीच त्यांना मदुराईमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याच्यावर करोनाचे उपचारही सुरु होते. मागील दहा दिवसांपासून शनमुगप्रिया यांची प्रकृती खालावत गेली आणि रविवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांना शनमुगप्रिया यांच्या बाळाला वाचवण्यात अपयश आलं.

दुसरीकडे वेल्लूरमधील राजीव गांधी नगर येथील वेल्लूर सरकारी रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या ५२ वर्षीय प्रेमा यांना ताप आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. २६ एप्रिल रोजी प्रिया यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मागील २५ वर्षांपासून त्या ज्या रुग्णालयात काम करत होते तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र दिवसोंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेल्याने अखेर त्यांना ऑक्सिजन आणि नंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र ९ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.

अशाचप्रकारे चेन्नईमधील राजीव गांधी सरकारी रुग्णालयामध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ३४ वर्षीय इंद्रा यांचाही करोना उपचारादरम्यान ९ मे रोजी मृत्यू झाला.

मागील काही दिवसांपासून सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडूचा समावेश आहे. तामिळनाडूमध्ये २४ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. राज्याने नवे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ही घोषणा केलीय. “१० मे रात्री चार वाजल्यापासून ते २४ मे रात्री चार वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय,” असं स्टॅलिन यांनी जाहीर केलं आहे.