News Flash

“नितीन गडकरी काय सांगत आहेत, हे नरेंद्र मोदी ऐकतायत का?”

लसनिर्मिती वाढवण्यासाठी नितीन गडकरींचा केंद्र सरकारला सल्ला

देशात एकीकडे करोना संकट असताना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक राज्यांनी लसीकरण थांबवलं आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी सल्ला दिला आहे. लसनिर्मितीसाठी जास्तीत जास्त कंपन्यांना परवाना दिला पाहिजे असं नितीन गडकरी यांनी म्हटटलं आहे. विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

“जर मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर समस्या निर्माण होते. एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना तसंच रॉयल्टी द्या,” असं नितीन गडकरी यांनी सुचवलं आहे. तसंच लसनिर्मिती वाढवण्यासाठी फॉर्म्युला देशभरातील इतर प्रयोगशाळांसोबत शेअर केला पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील हे सुचवलं होतं.

लसींच्या तुटवड्यावर नितीन गडकरींनी केंद्राला दिला सल्ला; म्हणाले…

“माझी खात्री आहे की, प्रत्येक राज्यात किमान एक ते दोन अशा प्रयोगशाळा असतील ज्यांच्याकडे क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील. त्यांच्यासोबत फॉर्म्युला शेअर करा आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी समन्वय साधा. नंतर ते देशात पुरवठा करतील. निर्मिती जास्त असेल तर ते निर्यातही करु शकतील. हे १० ते १५ दिवसांत केलं जाऊ शकतं,” असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर काँग्रेसने यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राची आठवण करुन दिली आहे. “हेच मनमोहन सिंग यांनी १८ एप्रिलला सुचवलं होतं. पण त्यांचे बॉस ऐकतायत का?,” असं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोदी सरकारने १ मे पासून लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. राज्य आणि खासगी रुग्णालयं थेट कंपन्यांकडून लस विकत घेऊ शकतात असं केंद्राने सांगितलं होतं. मात्र लसींचा तुटवडा असल्याने अनेक राज्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण लोकसंख्येच्या फक्त १० टक्के नागरिकांनाच लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:58 pm

Web Title: covid 19 congress jairam ramesh on bjp nitin gadkari vaccination sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Free Corona Vaccine: १५ जूनपर्यंत केंद्र पुरवणार ७ कोटी ८६ लाख लसी, संपूर्ण योजना जाहीर
2 ‘तौते’चे बळी! ‘पी-३०५’वरील १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह अरबी समुद्रातून काढले बाहेर
3 कोव्हॅक्सिनची लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल; कोर्टाची केंद्र सरकार आणि भारत बायोटेकला नोटीस
Just Now!
X