करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करण्याच्या हेतूने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेला हाताळताना झालेल्या चुकांचा उल्लेख असून तिसऱ्या लाटेचा सामना करताना नेमकं काय करण्याची गरज आहे याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. तिसरी लाट आल्यास आपली प्रतिक्रिया काय असावी याची ही ब्ल्यूप्रिंट असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

“It’s YogaDay! Not….” योगा दिवसावर राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

“दुसऱ्या लाटेत अनेकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. आपण त्यांना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवू शकलो नाही. पंतप्रधानांचे अश्रू सदस्य गमावलेल्या कुटुंबाचे अश्रू पुसू शकत नाही. त्यांचे अश्रू त्यांना वाचवू शकत नाही, ऑक्सिजन वाचवू शकतो. पण त्यांनी हे गांभीर्याने घेतलं नाही कारण त्यांचं सगळं लक्ष बंगालच्या निवडणुकीवर होतं,” अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला होता. यावेळी करोनामुळे निधन झालेल्यांबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक झाले होते. त्याचाच उल्लेख करत राहुल गांधींनी ही टीका केली.

“तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. विषाणू सतत बदलत असून सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून हे चार खांब विकसित केले आहेत,” असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

“यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. आक्रमकपणे आणि १०० टक्के लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. सरकार पूर्णपणे तयार असलं पाहिजे. रुग्णालयं, ऑक्सिजन, औषधं या सर्व गोष्टी उपलब्ध असलं पाहिजे,” असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.

“तर दुसरा खांब श्वेतपत्रिका आहे ज्यामध्ये रुग्णांसाठी गरज असणारी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध आहेत याची खातरजमा करणं आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारने तयार असणं गरजेचं आहे यावर जोर देताना राहुल गांधी यांनी याचा अर्थ दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका समजून घेत त्या दुरुस्त करणं,” असल्याचं म्हटलं आहे.