एकीकडे करोनाचं संकट आ वासून उभं असताना आणि रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना भाजपाशासीत कर्नाकटात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पक्की नोकरी आणि वेतनवाढ अशा काही मागण्या करत तब्बल ५०७ डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. करोनाच्या संकटात यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

हे सर्व कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे एमबीबीएस डॉक्टर आहेत. ते सध्या कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरकारी आरोग्य केंद्रात काम करत होते. वेतनवाढ आणि पक्की नोकरी अशा त्यांच्या मागण्या होत्या. परंतु राज्यातील भाजपा सरकारकडून केवळ आश्वासनंच मिळत असल्याने कंटाळून बुधवारी या डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिला. विशेष म्हणजे यातील अनेक डॉक्टर्स करोना ड्युटीवर होते.

नेमकं वेतन किती आहे आणि मागणी काय आहे?
करोना संकटाच्या काळात गावात काम करणाऱ्या या डॉक्टरांना ४५ हजार रुपये मासिक वेतन मिळते. मात्र, या डॉक्टरांचा आरोप आहे की नियमित असणाऱ्या डॉक्टरांना ८० हजार वेतन मिळते. एवढंच नाही तर ज्या डॉक्टरांना करोनाच्या काळात काँट्रॅक्टवर घेतलं आहे त्यांनाही ६० हजार रुपये महिन्याला पगार दिला जातोय. त्यामुळे आता आमचं वेतन वाढवावं, अशी त्यांची मागणी आहे.