पुढच्या दशकभराच्या काळात करोना विषाणूचा संसर्ग हा ताप-सर्दीसारखा सामान्य होणार असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. सध्याच्या या विषाणूचे शरीरावर होणाऱ्या परिणामांचा गणितीय दृष्टिकोनातून केलेल्या संशोधनातून हे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

आत्ताचा हा करोनाचा विषाणू मानवी शरीरावर आणि रोगप्रतिकारशक्तीवर कशा पद्धतीने परिणाम करतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. अमेरिकेतल्या उटाह विद्यापीठातले गणित आणि जैवविज्ञानाचे प्राध्यापक फ्रेड अॅडलर यांनी सांगितलं की, या संशोधनावरुन लक्षात येत आहे की अजूनही आपल्याला भविष्याबद्दल काहीही अंदाज आलेला नाही. पुढच्या दशकामध्ये या कोविड १९ आजाराची तीव्रता कमी होईल कारण तोपर्यंत आपल्या सर्वांमध्ये त्याला प्रतिकार करण्याची क्षमता तयार झाली असेल.

या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, या आजारात होणारे बदल हे विषाणूच्या स्वरुपामुळे होत नसून आपल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे होत आहेत. SARS-CoV-2 या प्रकारातल्या विषाणूबद्दल आपल्याला आत्ता समजलं आहे. मात्र इतरही अनेक हंगामी विषाणू आहेत ज्यांची आपल्याला लागण होते पण ते फारसे धोकादायक नसतात.
संशोधकांच्या अभ्यासावरुन त्यांना हे लक्षात आलं आहे की, सर्दी ज्या विषाणूमुळे होते, त्या विषाणूंच्या परिवारातले विषाणू अधिक तीव्र प्रकारचे झाल्यानेच १९व्या शतकात रशियन फ्लूची लाट आली होती. वेळेबरोबर या करोना विषाणूची तीव्रताही कमी होत जाईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. SARS-CoV-2 च्या विषाणूला मानवी रोग प्रतिकारशक्तीने दिलेल्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यासाठी या संशोधकांनी गणितावर आधारित अशी काही सूत्रं तयार केली.

अॅडलर सांगतात, या महामारीच्या सुरुवातीपर्यंत कोणालाही या विषाणूबद्दल काहीही माहिती नव्हती. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारशक्ती यासाठी तयार नव्हती.
या सूत्रांच्या साहाय्याने तयार केलेलं मॉडेल सांगतं की लसीच्या आधारे असेल किंवा लागण होऊन असेल, या विषाणूला प्रतिकार करण्यासाठी प्रौढांची प्रतिकारशक्ती तयार होत गेली की येत्या दशकामध्ये हा आजार पूर्णपणे नष्ट होईल. मात्र, आता फक्त लहान मुलं जी पहिल्यांदाच या विषाणूचा सामना करणार आहेत, त्यांचा प्रश्न राहील. कारण लहान मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांच्या तुलनेत कमकुवत असते.