गेल्या २४ तासांत देशात २७,१७६ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. याच कालावधीत करोनामुळे २८४ जण मृत्युमुखी पडल्याने करोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,४३,४९७ इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ पर्यंत वाढली असून ती एकूण करोनाबाधितांच्या १.०५ टक्के आहे. तर, एकूण ३,२५,२२,१७१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.६२ टक्के इतके आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ७५ कोटी ८९ लाख १२ हजार २७७ मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात लस टोचून घेतलेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख १५ हजार ६९० वर पोहोचली आहे.

देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता खूपच कमी; ICMR च्या माजी प्रमुखांचा दावा

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे. “करोनाची देशव्यापी तिसरी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. जरी आलीच तरीही ती दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूपच कमी तीव्रतेची असेल”, असा दावा रमण गंगाखेडकर यांनी केला आहे. न्यूज १८ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या वर्षी देशात करोना संसर्ग वाढू लागला तेव्हा ICMR चा मुख्य चेहरा ठरलेले डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली आहे. डॉ. रमण गंगाखेडकर मुलाखतीत पुढे असं म्हणाले की, देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता जरी कमी असली तरी शाळा पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयासाठी कोणतीही घाई करू नये.”