चीनच्या पूर्वेकडील यानताई बंदरामध्ये आयत करण्यात आलेल्या मासळीच्या पाकीटांवर करोनाचे विषाणू आढळून आल्याने एकच खबळ उडाली आहे. डालियान शहरामधून आलेल्या मासळीच्या पाकिटांवर हे विषाणू आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. फ्रोजन फूड प्रकारातील मासळीच्या पाकीटांवर हे विषाणू आढळून आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. यासंदर्भात यानताई शहर प्रशासनाने एक पत्रक जारी केलं असून डालियान शहरातून आलेली ही मासळी मूळ कोणत्या जागेवरुन आली आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

चीनच्या ईशान्येकडील लायऑनिंग प्रांतातील डालियान हे मोठं बंदर आहे. जुलै महिन्यामध्ये या बंदरामध्ये आयात करण्यात येणाऱ्या मासळीपैकी शिंपल्यांच्या पाकीटांवर करोनाचे विषाणू आढळून आले होते. इक्वाडोअर या देशामधून आलेल्या पाकिटांवर करोना विषाणू आढळून आल्यानंतर चीनने या देशातून मासळी आयात करण्यावर बंदी घातली होती. या देशातील तीन कंपन्यांच्या माध्यमातून चीनमध्ये मासळी आयात केली जात होती. चीनमधील वुहान येथील मासळी बाजारामधूनच करोनाचा मानवाला संसर्ग झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच मासळीच्या पाकीटांवरच करोनाचे विषाणू आढळून आल्याने प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याचा निर्णय घेत खबरदारीचा उपाय म्हणून आयात बंद केली आहे. वुहानमधून करोना विषाणूचा जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये संसर्ग झाला आहे. सध्या या विषाणूवर प्रभावी लस शोधण्यासाठी जगभरामध्ये १०० हून अधिक ठिकाणी चाचण्या आणि प्रयोग सुरु आहेत.

(Photo : Reuters)

यानताईमध्ये आयात करण्यात आलेल्या मासळीपैकी काही माल हा निर्यात करण्यात येणार होता. तर बराचसा माल हा येथील शितकपाटांमध्ये साठवून ठेवण्यात येणार होता. ज्या मासळीच्या पाकिटांवर करोनाचा विषाणू आढळून आले आहेत त्या मासळीबरोबर आलेला माल बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला नव्हता असं यानताई प्रशासनाने म्हटलं आहे. मात्र यापैकी काही माल निर्यात करण्यात आला आहे का असा प्रस्न विचारला असता करोनासंदर्भातील अधिकाऱ्यांनी प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकात सर्व माहिती आहे असं उत्तर दिल्याचं रॉयटर्सनं म्हटलं आहे.

सध्या यानताई शहर प्रशासनाने करोनाचा विषाणू आढलेला सर्व माल ताब्यात घेतला आहे. हा माल हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. एकाही कर्मचाऱ्याला करोनाचा संसर्ग झालेला नाही असं प्रशासनाने म्हटलं आहे. ज्या डालियान शहरामधून ही मासळी मागवण्यात आली होती तिथे मागील महिन्यामध्येच करोना संसर्गाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळालं होतं. धक्कादायक बाब म्हणजे मासळी पॅकेजिंगसंदर्भात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरनाचा संसर्ग झाला होता. ९ ऑगस्टपर्यंत डालियान शहरामध्ये करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले होतं.