जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनी लॉकडाउनही लागू केलं आहे. परंतु याचा अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. अनेकांच्या रोजगाराचाही प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच अमेरिकेतील दिग्गज कंपनी वॉल्ट डिस्नेनं २८ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी सर्वाधिक कर्मचारी हे थीम पार्कमध्ये काम करत आहेत. करोना महासाथीचा सर्वाधिक फटका हा अमेरिका, भारत आणि त्या खालोखाल ब्राझीलला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांचे आकर्षण असणारे डिस्नेलँड बंद आहे.

ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे त्यापैकी दोन तृतीयांश कर्मचारी अर्धवेळ कामगार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा डिस्नेने थीम पार्क बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. डिस्नेलँड वगळता उर्वरित उद्याने उघडली गेली आहेत. परंतु सामाजिक अंतराच्या नियमांमुळे पर्यटकांची संख्या मर्यादित राहिली आहे.

“अतिशय कठिण परिस्थिती आम्हाला कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागला. सर्वच स्तरांवरील कर्मचाऱ्यांची कपात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व्यवस्थापनानं खर्च करणं, प्रकल्प बंद करणं आणि अन्य काही बाबींमध्ये बदल करत कर्मचारी कपात न करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे नाईलाजानं कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागला,” अशी प्रतिक्रिया डिस्नेच्या पार्क युनिटचे अध्यक्ष जोश डी अमारो यांनी निवेदनाद्वारे दिली.